अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून अनेक भागात पाहणी

पिंपरी : अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनीही स्वतः शहरातील अनेक भागात जाऊन बंदोबस्ताची पाहणी केली. अयोध्येच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शनिवारी दिला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही हिंदुंची असल्याचे सांगत ही जागा हिंदूंना देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तर अयोध्येतच पर्यायी 5 एकर जागा मुस्लिमांना मशिद बांधण्यासाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस सतर्क असून तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

पोलीसांच्या सुट्ट्या रद्द; सोशल मिडीयावर लक्ष..

पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करून बंदोबस्ताची योग्य आखणी केली आहे. तसेच पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनीही स्वतः बंदोबस्ताची पाहणी केली होती. नागरिकांनी सोशल मीडियावर आफवा पसरविणारे संदेश पुढे पाठवू नये. सोशल मीडियावर असे संदेश पाठविणार्‍यांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे संदेश सोशल मीडियावर टाकू नये. तसेच, धार्मिक भावना दुखावतील, असा जल्लोष व फटाके वाजवू नये, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस आयुक्तांनी लालटोपीनगर, मोरवाडी मशिद, नेहरूनगर, पिंपरी चौक, गौसिया मशिद काळेवाडी, दापोडी मशिद, भोसरी चक्रपाणी वसाहत, कुदळवाडी, रूपीनगर, ओटास्किम, वाल्हेकरवाडी या परिसरात भेट देऊन पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here