पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना 25 लाखापर्यंतची खरेदी करण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत. निविदा मागविणे, निविदा स्वीकारणे, पुरवठा आदेश देणे, करारनाम्यावर स्वाक्षरीचेही अधिकार दिले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि.13) होणाऱ्या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

डॉ. पवन साळवे यांच्याकडे 28 फेब्रुवारी 2019 रोजी वैद्यकीय विभागाचा विभागप्रमुख या पदाचा भार सोपविण्यात आला आहे. डॉ. साळवे यांच्याकडे रूग्णालये आणि दवाखान्यांचे नियंत्रण सोपविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने डॉ. साळवे यांना वैद्यकीय विभागप्रमुखाचे अधिकार प्रदान करणे आवश्यक होते.

त्यानुसार डॉ. पवन साळवे यांना 25 लाखापर्यंतच्या कमाल मर्यादेपर्यंत खर्च अंतर्भूत असलेली खरेदी करण्याचे अधिकार देण्यात येणार आहे. 25 लाखापर्यंतच्या कामांच्या संदर्भात निविदा मागविणे, निविदा स्वीकारणे, पुरवठा आदेश देणे, महापालिकेच्या वतीने करारनाम्यावर स्वाक्षरी करणे, तसेच कार्यालयीन खर्चासाठी कामाचे आदेश देणे, बिले मंजूर करण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत. तर, 25 लाखापुढील खरेदी, निविदा मागविणे, पुरवठा आदेश देण्यासाठी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांची मान्यता आवश्यक आहे.

दोन लाख मर्यादेपर्यंतच्या कार्यालयीन खर्चासाठी आवश्यक सामुग्री, सल्लागार खर्च, संगणक स्टेशनरी, संगणक साहित्य विकत घेणे, कामाचे आदेश देणे, बिले मंजूर करणे, कार्यालयीन वापरासाठी 25 हजार पर्यंत स्थायी अग्रिमधन बिले मंजूर करणे आणि वाहन इंधनासाठी 50 हजारापर्यंत स्थायी अग्रिमधन बिले मंजूर करण्याचे अधिकार डॉ. साळवे यांना देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणा-या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here