पिंपरी :- पिंपरी – चिंचवड शहरामध्ये हवामानातील सततच्या बदलामुळे शहरात डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांना पोषक वातावरण तयार होऊन या रोगांची वाढ होत आहे. या रोगांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांना महागडे वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत. या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरे दुकानाच्या आसपासच्या परिसराची तपासणी आरोग्य विभागामार्फत नियमितपणे होणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे डासांची उत्पत्ती ची ठिकाणे शोधून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच डेंग्यू चिकनगुनिया व मलेरिया या रोगाच्या प्रतिबंधक गोळ्या लसी मनपाच्या दवाखान्यात पुरेश्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे आहे की, मनपाच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे औषध फवारणी, औष्णिक धूर फवारणी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच जंतुनाशक औषधे ही वेळेवर उपलब्ध होत नसतात. त्यामुळे औषध फवारणी करण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागात औषध फवारणीची किती औषधे मागील सहा महिन्यात किंवा पूर्वी किती खरेदी केली आहे, याची सविस्तर माहिती देण्यात यावी. त्याच प्रमाणे शहरांमध्ये भटकी कुत्री तसेच मोकाटे डुकरे यांची संख्या वाढलेली आहे.
मनपा याबाबत कुत्री व डुकरे पकडली. याबाबत फक्त कागदी घोडे नाचवत आहेत. प्रत्यक्षात कार्यवाही काहीच करीत नाही. त्यामुळे शहरात कुत्र्यांची व डुक्कराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा व डुकरांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील भटकी कुत्री व डुक्कर पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात यावी, अन्यथा आरोग्य विभागात मोकाट कुत्री व डुक्करं सोडण्यात येतील, असे या निवेदनात काटे यांनी म्हटले आहे.