एक मराठा, लाखो मराठे

एक मराठा, लाख मराठा, असा जयघोष करत मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात लाखोंच्या संख्येने मोर्चे सुरू आहेत, त्या झंझावाताचा प्रत्यक्ष अनुभव रविवारी (दि. 25 सप्टेंबर) पुणेकरांनीही घेतला. गर्दीचे आतापर्यंत प्रस्थापित झालेले सर्व ‘रेकॉर्ड’ या मोर्चाने मोडीत काढले. त्यामुळे या आंदोलनाची केवळ पुण्याच्या नव्हे, तर देशाच्या इतिहासात नोंद होईल. गेले कित्येक दिवस या मोर्चाची अनेक पातळीवर जोरदार तयारी सुरू होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिशय शिस्तबध्द पध्दतीने नियोजन करण्यात आलेल्या या मोर्चांसाठी हजारो स्वंयसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्ह्याच्या सर्व दिशेकडून या मोर्चासाठी मराठे येतच होते. हजारो वाहने व त्यातून लाखोंच्या संख्येने आलेल्या मराठ्यांमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचे स्मरण करत शांततामय मार्गाने निघणार्‍या या मोर्चांना कोणत्याही राजकीय पक्षांचे अथवा प्रस्थापितांचे नेतृत्व नाही. तरीही इतका मोठा समाज रस्त्यावर कसा काय येऊ शकतो, असा प्रश्‍न अनेकांना पडला. वास्तविक, कोणत्याही पक्षाच्या किंवा विचारांना भारून मराठे रस्त्यावर आले नाहीत, तर वर्षानुवर्षे सर्वच राज्यकर्त्यांकडून होत आलेली फसवणूक आणि सामाजिक पातळीवर पिचलेल्या अवस्थेत वर्षानुवर्षे राहिल्याचा उद्रेक यानिमित्ताने मराठ्यांमध्ये पहायला मिळतो आहे. या मोर्चांची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही घेतली. पुण्याचा मोर्चा सुरू असतानाच मुंबईत पुन्हा एकदा सरकार मराठ्यांसोबत असून, त्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, या भूमिकेचा मुख्यमंत्र्यांनी पुनरूच्चार केला. मुख्यमंत्र्यांनी केवळ ‘बोलाची कढी, बोलाचा भात’, असा प्रकार न करता यापूर्वी घेतल्या गेलेल्या मराठा आरक्षणासह अन्य महत्त्वाच्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करावी. मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करू नये.

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here