सांगवी – पिंपळेगुरव येथे वारंवार माहेरहून पैसे घेऊन येण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद तुळशीदास जगताप (वय 32), आशा तुळशीदास जगताप (वय 60), तुळशीदास जगताप (वय 68), योगिता चंद्रकांत जाधव (वय 40, सर्व रा. पिंपळे गुरव), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 30 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे लग्न झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांपासून सासरच्या मंडळींनी त्यांच्याकडे माहेरहून वारंवार पैसे घेऊन येण्याची मागणी केली. तसेच त्यावरून शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी महिलेच्या जीवितास धोका निर्माण करून मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.