पिंपरी :- दापोडी प्रभाग क्र.३० मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात १०० टक्के पाणीसाठा असताना देखील दापोडीकरांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा पिंपरी चिंचवड महापालिकेवर हंडामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी दिला आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका माई काटे, नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे यांनी दापोडीतील पाण्याच्या समस्येबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभाग क्र.३० दापोडी येथे बऱ्याच दिवसांपासून अपुरा आणि विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. वारंवार तक्रारी व निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची सुधारणा प्रशासनाकडून झालेली नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात १०० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तरी देखील दापोडीकरांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. येत्या दोन दिवसांत दापोडी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेवर हंडामोर्चा काढत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेविका माई काटे, नगरसेवक रोहित काटे आणि राजू बनसोडे यांनी आयुक्तांना दिला आहे.