मुंबई – राज्याच्या निवडणुकांचे निकाल लागून बराच कालावधी उलटला आहे. तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. एकीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सत्तास्थापनेचा पेच अद्यापही सुटल्याचं दिसत नाही. अशातच संजय राऊत यांनी राज्यात शिवसेनाच सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांना समजून घेण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील. त्यांचा अनुभव दांडगा आहे असं विधान केलं. त्यांच्या विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

सत्ता स्थापनेबाबत शिवसेना भाजपाला विचारा असं शरद पवार म्हणाले होते. यावरून राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शरद पवार हे काहीही चुकीचं बोलले नसल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि तेही शिवसेनेच्याच नेतृत्वात होईल, म्हणूनत पवार असं म्हणाले असल्याचं राऊत यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात शरद पवार माझे गुरू. पवारांची खरी लढाई ही भाजपाशी आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्यांवरून भाजपानं काहीतरी शिकावं असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित नव्हता. त्यामुळे तो रद्द झाल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांचा अयोध्या दौरा रद्द झाला असं म्हणून कोणीही दिशाभूल करू नये, असंही राऊक म्हणाले. भाजपानं त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच होणार आहे. येत्या काळात भाजपाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि त्याचं नेतृत्व हे शिवसेनाच करेल. शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच स्थिर सरकार स्थापन होईल आणि यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करताना १७० जणांचा पाठिंबा दाखवून देऊ. राष्ट्रपती शासन हे सहा महिन्यांसाठी लागू झालं आहे. ते संपण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल, असंही राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here