विधानसभा निवडणूक निकालानंतर दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना फार काळ मुख्यमंत्रीपदावर राहता आले नाही. सर्वोच्च न्यायालयानं 27 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यात दोन धक्कादायक घटना घडल्या. भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळं बहुमत चाचणी आधीच अल्पमतात आलेलं फडणवीस सरकार अवघ्यात साडेतीन दिवसात कोसळलं.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. यावर तडजोड करण्यास भाजपानं नकार दिला. शिवसेनेनं भाजपाला दूर सारत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे सत्तास्थापनेसाठी हात पुढे केला होता. वेळेत दोन्ही (राष्ट्रवादी आणि काँग्रेस) पक्षांनी पाठिंबा न दिल्यानं शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही.

राजकीय गोंधळ सुरू झाल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली होती. राष्ट्रपती राजवट लागू असतानाच महाविकास आघाडी आकाराला आली. पण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापनेचा दावा करण्याआधीच शनिवारी सकाळी महाराष्ट्र राजकीय भूकंपानं हादरला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला ओव्हरटेक करत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा केला आणि मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांना फार काळ पदावर राहता आलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here