– नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांची मागणी

पिंपरी | पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामाची मिळकत कर आकारणी केली जात नसल्याचे उघड झाले आहे. तसेच वाढीव बांधकामे, वापरात अदला-बदल केलेल्यांची नोंदी झालेल्या नाहीत. यामुळे महापालिकेचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. त्या बांधकामाच्या नोंदी करुन त्याची मिळकत कर आकारणी करण्यात यावी, त्यात अडथळा करणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ह प्रभाग समिती अध्यक्ष अंबरनाथ कांबळे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, करसंकलन सहायक आयुक्त स्मिता झगडे यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत असलेल्या बांधकामाचे मिळकत कर आकारणी होत नाही. शेकडो मिळकत धारकांनी वाढीव बांधकामाच्या नोंदीही केलेल्या नाहीत. जुन्या मिळकतीवर वाढीव बांधकाम केलेले आहे.

शहरातील वाढीव बांधकामाच्या नोंदी करण्यात आलेल्या नाहीत. त्या लवकारात लवकर करुन घ्याव्यात, शहराचा विकास पाहता महापालिकेस एकमेव उत्पन्नाचे स्तोत्र असलेल्या करसंकलन विभागाला अपेक्षीत उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना नागरी सुविधा देणे आणि विकास कामांवर त्यांचा परिणाम होवू लागला आहे.

ज्या मिळकती नवीन, वाढीव, वापरात बदल झालेल्या ( निवासी / बिगरनिवासी ) अशा मिळकतीच्या नोंदी केलेल्या नाहीत, त्यांनी त्वरीत संबंधीत करसंकलन विभागीय कार्यालयाकडे संपर्क साधून नोंदी करुन घ्याव्यात. जे मिळकतधारक अथवा राजकीय पदाधिकारी, शासकीय कर्मचारी, उदयोगपती नोंदी करण्यास सहकार्य करत नसतील, अशा मिळकतधारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी कांबळे यांनी केलीय.

तसेच वाढीव व अनधिकृत बांधकाम नोंदी बाबत आजी/माजी नगरसदस्य, राजकीय पदाधिकारी यांचा हस्तक्षेप झाल्यास त्यांचेवरही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे ह प्रभाग समिती अध्यक्ष अंबरनाथ कांबळे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here