पाणीपुरवठा विभागाकडून अनधिकृत व्यावसायिक नळजोड शोधण्याची मोहिम

हॉटेल, कार वॉशिंग सेंटर, बांधकाम व्यावसायिक नळांवर होणार कारवाई

पिंपरी चिंचवड एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत व्यावसायिक नळजोड शोधण्याची मोहिम हाती घेतली आहे. आतापर्यंत पन्नासहून अधिक नळजोड तोडले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने (दि.25) पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. हॉटेल, कार वॉशिंग सेंटर, बांधकाम व्यावसायिक नळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत नळजोड शोधण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पाणी फुकट वापरून पैसे कमविण्याचे प्रकार…

महापालिकेच्या नळयोजनेतून व्यावसायिक वापरासाठी अनधिकृतरित्या पाणी घेतले जाते. हे व्यावसायिक महापालिकेचे पाणी फुकट वापरून त्यावर पैसे कमवतात. परंतु, त्यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान होते. तसेच, रहिवाशी भागात पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते. त्यामुळे या पध्दतीने चोरून व्यावसायासाठी पाणी वापरणा-या आणि अनधिकृत नळजोड घेणा-या पन्नास व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून त्यासाठी महापालिका अधिकारी, कर्मचा-यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

एकापेक्षा अधिक नळ असल्यास दंड…

सर्वेक्षणात व्यावसायिक नळजोडांवर थेट कारवाई केली जाणार आहे. तर, रहिवाशी भागातील अनधिकृत नळजोड सापडल्यास जागेवरच ते अधिकृत केले जाणार आहेत. त्यांचे नावे अनामत रक्कम, दंड, विलंब शुल्काची रक्कम पाच हप्त्यांमध्ये टाकण्यात येऊन पाणीबील देण्यात येईल. ऐकापेक्षा जास्त नळजोड असल्यास ते तोडून त्यांच्याकडून दंडाची वसूल करण्यात येणार आहे. त्याची देखील प्रभावीपणे कारवाई केली जाणार आहे. या कारवाईसाठी खास सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून हॉटेल, कार वॉशिंग सेंटर, बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई आणखी कडक केली जाईल, असे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here