पुणे : मिळकतकर थकबाकी वसुलीसाठीची अभय योजना सर्व प्रकारच्या मिळकत धारकांसाठी आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत थकबाकी भरणार्‍या मिळकत कर थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत 75 टक्के सूट देण्यात येणार आहे. तर 16 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान ही रक्कम भरणार्‍यांसाठी दंडाच्या रकमेत 50 टक्के सूट पुणे महापालिकेकडून दिली जाणार आहे.
या योजनेला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्यास पुणे महापालिकेला यामधून सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, उपायुक्त तथा करआकारणी व करसंकलन प्रमुख सुहास मापारी याप्रसंगी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले, यंदाच्या वर्षी 1 जानेवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान 25 हजार रुपये वार्षिक करपात्र रक्कम असलेल्या थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली होती. या योजनेचा 1 लाख 45 हजार 675 थकबाकीदारांनी लाभ घेतला असून 387 कोटी 49 लाख रुपयांचा महापालिकेकडे महसूल जमा झाला आहे.
सद्य स्थितीला 25 हजारांपेक्षा अधिक वार्षिक करपात्र रक्कम असलेल्या 2 लाख 82 हजार 272 थकबाकीदारांकडे एक हजार 253 कोटी रुपये आणि दंडाचे 887 असे 2 हजार 148 कोटी रुपये थकित आहेत. या थकबाकीदारांकडूनही वसुली करण्यासाठी अभय योजना राबविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्याला आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here