नदी स्वच्छता जनजागृतीसाठी भव्य रिव्हर सायक्लोथॉन

पिंपरी : भावी पिढीला स्वच्छ पाणी व हवा देणे ही आपली जबाबदारी आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणविषयक जनजागृती केली पाहिजे. यामध्ये प्रशासनाबरोबरच नागरिकांचा प्रत्यक्ष सहभागदेखील आवश्यक आहे. जबाबदारीची ही जाणीव ठेवून अविरत श्रमदान व सायकल मित्र या पर्यावरणप्रेमी संस्थांनी पुढाकार घेतला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त अविरत श्रमदान, सायकल मित्र आणि महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नदी स्वच्छता प्रबोधनासाठी भोसरी येथे रविवारी  (दि. 1 डिसेंबर) रिव्हर सायक्लोथॉन या रॅली काढण्यात आली. भोसरी येथील गावजत्रा मैदानात सकाळी 6.30 वाजता महापौर माई ढोरे व आमदार महेश लांडगे यांनी रॅलीला झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली.

यावेळी माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक संतोष लोंढे, माजी नगरसेवक दत्तात्रय गायकवाड, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, कामगार नेते सचिन लांडगे, अविरत श्रमदानचे डॉ. निलेश लोंढे, दिगंबर जोशी, रिव्हर सायक्लोथॉनचे अशोक माने, सामाजिक कार्यकर्ते कार्तिक लांडगे आदी उपस्थित होते.

पवित्र इंद्रायणी नदी किनारी देहू-आळंदी तिर्थक्षेत्र आहे. या नदीचे सांप्रदायिक क्षेत्रात अनन्य साधारण महत्व आहे. नदीकिनारी वसलेल्या देहू, तळवडे, चिखली, मोशी, डुडूळगाव, आळंदी, च-होली, मरकळ, निघोजे, कुरूळी, कोयाळी, चिंबळी परिसरात वाढलेल्या लोकसंख्येमुळे इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. नदीकिनारी असणा-या कारखानदारी व लोकवसाहतीमुळे नद्या प्रदूषित होत आहेत. नदी प्रवाही ठेवणे व जलसाठे प्रदूषणमुक्त ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहेच. परंतू भावी पिढीला स्वच्छ पाणी व पर्यावरण देण्याची जबाबदारी नागरिकांचीदेखील आहे. याबाबत जनजागृती व प्रबोधन व्हावे या उद्देशाने रिव्हर सायक्लोथॉन हा उपक्रम आयोजित केला होता. यामध्ये 10 हजारांहून जास्त नागरिकांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने सर्व शाळांमध्ये पर्यावरणपूरक उत्सव या विषयांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत  55000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या अभिनव उपक्रमात सर्व पर्यावरणप्रेमी संस्था, पतंजली योग, डॉक्टर्स असोसिएशन, फार्मासिस्ट असोसिएशन, वकील संघटना, रोटरी, लायन्स क्लब, माजी सैनिक संघटना सहभागी झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here