स्थायी सभापती विलास मडिगेरी यांनी घेतली आयुक्तांची भेट

पिंपरी | दापोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी (दि. 1) ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या कामगाराला वाचवताना पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशामक दलाचे कर्मचारी विशाल जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ठेकेदाराचे कर्मचारी नागेश जमादार यांचाही मातीच्या ढिगाखाली अडकून मृत्यू झाला. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 20 लाख एवढी रक्कम मिळणार आहे. तर, जाधव यांच्या पत्नीला पालिकेत नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी दिली आहे.

या दुर्घटनेत फायरमन विशाल जाधव आणि नागेश जमादार या दोघांचा मृत्यू झाला. जाधव हे पालिकेचे कर्मचारी आहेत. तर जमादार यांची ठेकेदाराने नेमणूक केलेली आहे. याशिवाय दोन कर्मचारी निखील गोगावले आणि सरोज फुंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सांगवीतील माकन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. महापालिकेच्या अग्निशामक विभागातील धोकादायक स्वरुपाचे काम करणा-या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी New India Insurance Co.कडे विमा उतरवलेला आहे. त्याअंतर्गत कर्मचा-यांच्या कुटुंबियास १० लाख रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडील दि. ११/८/२०१७ च्या आदेशान्वये राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनाअंतर्गत १० लाख इतकी रक्कम असे एकुण २० लाख रुपये रक्कम विमा पोटी मिळणार आहे, अशी माहिती मडिगेरी यांनी कळविली आहे.

विशेष म्हणजे जाधव यांची पत्नी सुशिक्षित पदवीधर असल्याचे समजते. तसेच, त्यांना २ ते २.६ वर्षाची मुलगी आहे. सदर दु:खदायक घटनेतून सावरताच त्यांचा मनपा सेवेत नोकरीसाठी अर्ज आल्यानंतर तातडीने त्यांना मनपाच्या अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा झाली. आयुक्तांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच, ठेकेदाराकडील नागेश जमादार या कर्मचा-याचेही निधन झाले आहे. निविदेतील अटी, शर्तीनुसार ठेकेदाराने उतरविलेल्या कॉन्ट्रक्टर ऑल रिस्त विमामधुन सदर कर्मचा-यांस २ लाख इतकी रक्कम विमापोटी मिळू शकते. याशिवाय ठेकेदाराकडून जास्तीत जास्त मदत त्याच्या कुटुंबियाला मिळवून देणेकामी प्रयत्न केले जातील आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींना देखील पालिकेच्या वतीने आर्थिक मदत केली जाणार आहे, असेही मडिगेरी यांनी नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here