पिंपरी चिंचवड – स्त्रीयांच्या शिक्षणासाठी महात्मा फुले यांनी अपार कष्ट घेतले. त्यांच्यामुळेच स्त्रियांचा सामाजिक विकास झाला. महात्मा फुलें यांच्यापासूनच मानवतेच्या विकासाबरोबर त्यांनी सामाजिक परिवर्तनाला त्यांनी सुरूवात केली. त्यांचा वारसा जपत प्रत्येकाने सामाजिक परिवर्तनाची सुरूवात स्वतःपासून करावी, असे प्रतिपादन मुंबईच्या जिल्हा न्यायाधिश जयश्री जगदाळे यांनी केले. दरम्यान, हैद्राबादमध्ये झालेल्या सामुहिक अत्याचाराचा निषेध करत संबंधीत पिढीतेला आदरांजली वाहण्यात आली.

पिंपरी येथील मेघाजी लोखंडे कामगार भवनमध्ये भीम प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोफत काम करणार्‍या संस्था, संघटना व व्यक्‍तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, गुलाब पानपाटील, के. के. कांबळे, आकाश दौंडे, सीए अरविंद भोसले आदी प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी जिल्हा न्यायाधिश जगदाळे यांच्या हस्ते रयत विद्यार्थी विचार मंचचे धम्मराज साळवे, अंजना गायकवाड, संतोष शिंदे, विजय जगदाळे, रॉबिनहुड संस्थेचे आकाश अगरवाल, राहुल गुप्‍ता, सुमित मंडल आदींचा सत्कार करण्यात आला.

काशिनाथ नखाते म्हणाले की, महात्मा फुले यांनी नव्या पिढीला शिक्षणाद्वारे घडविण्याचे काम केले. महात्मा फुलेंनी अनेक सामाजिक आदर्श घालून दिले. केशवोपनाची प्रथा त्यांनी बंद केली. त्यांनी अनेक पोवाडे लिहिले, शिवजयंती सुरू केली. त्यांच्या आदर्शावर चालणारे मानवतावाद पुढे घेऊन जात आहेत. त्यांचा विचार जोपासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन या वेळी नखाते यांनी केले.

गुलाब पानपाटील, आकाश दौंडे यांनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे धीरज लोखंडे यांनी आभार मानले. संविधान प्रास्ताविक प्रतीचे सामुहिक वाचन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here