टक्केवारी बंद करा. प्री- मिटींग घ्या – राहुल कलाटे भडकले…

पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी यांनी प्री-मिटींग न घेताच स्थायीची बैठक सुरू केल्याने सभागृहात चांगलाच राडा झाला. असाच कारभार करायचा असेल तर टक्केवारी घेणं बंद करा, अशा शब्दात शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी सभापतींवर हल्लाबोल केला. तर राष्ट्रवादीच्या मयूर कलाटे यांनी देखील मडेगिरी यांना चांगलेच तावडीत पकडले. अखेर सभापती विलास मडेगिरी यांनी स्थायीची बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेत, बैठक पुढे ढकलली.

पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची साप्ताहिक बैठक बुधवारी होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडेगिरी हे होते. नेहमी प्रमाणे सभा देखील सुरु झाली. मात्र या सभेपूर्वी होणारी सदस्यांची ‘प्री-मीटिंग’ सभापतींनी ऐनवेळी रद्द केली. त्याचे पडसाद आजच्या सभेत उमटले. सभापतींनी घेतलेल्या या निर्णयाला शिवसेनेच्या राहुल कलाटे आणि राष्ट्रवादीच्या मयूर कलाटे यांनी विरोध दर्शवला. ‘प्री-मीटिंग’ घ्यायची नसेल तर या सभागृहात विषयांचे प्रस्ताव पूर्णपणे वाचून दाखवा. सदस्यांना विषय समजले पाहिजेत. नुसतं ‘तहकूब’ आणि ‘मंजूर’ अशा पद्धतीने सभागृह आम्ही चालू देणार नाही, अशी भूमिका कलाटे बंधूंनी घेतली. त्यावर “मी माझ्या पद्धतीने सभागृहाचे कामकाज चालविणार” असे वक्तव्य सभापती विलास मडेगिरी यांनी केले. आणि त्यावरून राहुल कलाटे आणि मयूर कलाटे ‘आक्रमक’ झाले.

दादागिरी खपवून घेणार नाही…

“दादागिरी करू नका, अरेरावीची भाषा कदापि खपवून घेणार नाही. कायद्यानेच सभागृह चालवावे लागेल. अशाच पध्दतीने काम करायचयं तर स्थायीतील टक्केवारीच बंद करा. आम्ही मर्यादा सोडत नाही. इथे जे काही तुम्ही करतायं हे जनतेला समजले पाहिते. या सभागृहातील बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण झाले पाहिजे” असा सूर राहुल कलाटे यांनी धरला. दरम्यान कुणी तरी बाहेरून स्थायी समिती चालवतो का? असा सवाल देखील उपस्थित करत राहुल कलाटे यांनी विलास मडेगिरी यांना अक्षरश: ‘घाम’ फोडला. त्यानंतर मयूर कलाटे यांनी ही सभाच तहकूब करण्याची सूचना केली. आधी ‘प्री-मीटिंग’ घ्या. सदस्यांना विषय समजू देत. त्यानंतर स्थायीची बैठक घेऊ अशी भूमिका त्यांनी मांडली. त्याला भाजपचे सदस्य शितल शिंदे सहमती दर्शवत सभा तहकूब करण्याची सूचना सभापती पुढे केली. अखेरीस सभागृहात एकाकी पडलेल्या सभापती विलास मडेगिरी यांनी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. ही सभा पुढच्या बुधवारपर्यंत (दि.११) तहकूब करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here