पिंपरी | दहा हजाराची लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मोशी येथे करण्यात आली. भरत सोनू बांगर (वय 35 ) असे लाच स्वीकारणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. बांगर भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. याप्रकरणी 55 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी बांगर यांनी तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यातील 10 हजारांची रक्कम स्वीकारताना बांगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रात्री रंगेहाथ पकडले.