पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेची सध्या उपलब्ध असलेली मुख्य प्रशासकीय इमारत अपुरी पडत असल्याने आता महापालिका प्रशासनाने “आय टू आर’ अंतर्गत ताब्यात आलेल्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचे नियोजन केले आहे. २४ हजार ५४४ चौरस मीटर भूखंडामध्ये तळमजल्यासह नऊ मजली इमारत साकारणार आहे. या इमारतीसाठी अंदाजे २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथे सध्या महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत आहे. ही इमारत महापालिकेच्या विविध विभागांसाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे महापालिकेला काही विभाग अन्यत्र हलवावे लागले आहेत. क्रीडा विभाग सध्या सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेत कार्यरत आहे. एलबीटी विभाग “क’ प्रभाग कार्यालयात हलविण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन विभाग चिंचवड येथील भाजी मंडईशेजारी स्थलांतरीत केला आहे. तसेच, सध्या असलेल्या महापालिकेच्या इमारतीत पार्किंगसाठी देखील खुपच अपुरी जागा आहे. त्यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव पुढे आला असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

पिंपरी येथे महिंद्रा ऍन्थीयाशेजारी “आय टू आर’ अंतर्गत महापालिकेकडे २४ हजार ५४४ चौरस मीटरचा भूखंड ताब्यात आला आहे. त्यामध्ये संबंधित इमारतीचे बांधकाम नियोजित आहे. इमारतीचे पार्किंगसह बांधकाम क्षेत्रफळ ८७ हजार ७१२ चौरस मीटर इतके आहे. ३० हजार ३३७ चौरस मीटर जागेत पार्किंगची सोय असणार आहे. त्यामध्ये ८४६ कार आणि ३ हजार ३८४ दुचाकींची सोय असेल. दुचाकी पार्किंगसाठी स्वतंत्र पाच मजली इमारत नियोजित आहे. इमारतीसाठी अंदाजपत्रकीय खर्च निश्‍चित करण्याचे काम सध्या सुरू आहे. निविदा कार्यवाही झाल्यानंतर पुढील अडीच वर्षांमध्ये प्रत्यक्ष इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here