पिंपरी :- दापोडी येथे झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत अमृत जलवाहिनी योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून कामगाराचा दुर्दैंवी मृत्यू झाला होता. महापालिका आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली होती. तरी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागेश जमादार यांच्या कुटुंबियांना महापालिकेने आर्थिक मदत करावी. तसेच कुटूंबातील एका सदस्याला महापालिकेत नोकरी द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात सहशहर अभियंता मकरंद निकम यांना शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, दापोडी येथे काही दिवसांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली. अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाच्या खड्ड्यात पडून गुदमरून नागेश जमादार या कामगाराचा मृत्यू झाला. महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या घटनेत कामगाराला आपला जीव गमवावा लागला आहे. नागेश जमादार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढविले आहे.  नागेश हा घरातील एकटा कमवता होता. त्याच्या मागे चार बहिणी व आई-वडील असा मोठा परिवार असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागेश यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व पालिकेत कायम स्वरूपाची नोकरी देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी महापालिकेकडे केली आहे.

यावेळी उपजिल्हासंघिटका स्वरूपा खापेकर, नगरसेवक राजू बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, युवतीसेना अधिकारी प्रतीक्षा घुले विभागसंघटक निलेश हाके, शिल्पा अनपन, संगीता आल्हाट, विकास गायकवाड, सिद्धार्थ पगारे, लक्ष्मण शिवशरण, प्रताप शीरशेट्टी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here