पिंपरी | मराठवाडा जनविकास संघ व जय भगवान महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती मराठवाडा जनविकास संघाच्या प्रांगणात साजरी करण्यात आली. मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडा जनविकास संघ व जय भगवान महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने सकाळी नऊ वाजता “विकास आश्रम” सोनवणे वस्ती, चिखली येथील विद्यार्थ्यांना फळे व धान्य वाटप करण्यात आले व मौजे बिजनवाडी येथील भजनी मंडळींना २५ टाळ व एक मृदंगाचे वाटप करण्यात आले.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी बोलताना हभप तांदळे महाराज म्हणाले की, गोपीनाथ मुंडे हे जनसामान्यांचे नेते होते. त्यांचे कार्य आपणास निश्चितच प्रेरणादायी व बोधप्रद असेच होते. मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून होत असलेली कामे उल्लेखनीय आहेत. तसेच, पिंपरी-चिंचवड नगरीमध्ये मराठवाड्यातील बांधवांसाठी मराठवाडा भवन व गोपीनाथजी मुंडे यांचे स्मारक उभे करण्याचे मराठवाडा जनविकास संघाने ठरविले आहे. गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुढील जयंतीपर्यंत मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने भूमिपूजन होईल.

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार म्हणाले की, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे कार्य महान आहे. मराठवाडा भागातील सुमारे ४ लाख बांधव उदरनिर्वाहसाठी पिंपरी-चिंचवड शहरामध्ये स्थायिक झाले आहेत. आपल्या बांधवांच्या मुला-मुलींची शिक्षणासाठी पिं.चिं शहरात आल्यावर हाल होवू नयेत, यामुळे आपण “मराठवाडा भवनाचे” उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. याकरीता मराठवाडा जनविकास संघाने जनगणना सुरु केली होती. त्या जनगणनेमध्ये एक लाखाच्या पुढे नोंदणी पूर्ण झालेली आहे. या सर्व बांधवांच्या सहकार्याने मराठवाड्यातील बांधवांसाठी मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून मराठवाडा भवन व लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन हे पुढील वर्षीच्या जयंतीपर्यंत होईल, अशी अपेक्षा आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संपत गर्जे होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राजपूत महासंघाचे दिनेशसिंह राजपूत यांनी लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांचा जीवन प्रवास आपल्या भाषणातून उलगडून दाखवला. जोशी मॅडम यांनी मुंडे यांच्या जीवनावरील कविता वाचून दाखवली. त्याचबरोबर जय भगवान महासंघाचे हनुमंतराव घुगे, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ सदस्य, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक सदस्य, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक सदस्य हे बहुसंख्येने उपस्थित होते. श्रीकांत चौगुले आदी मान्यवरांनी आपल्या भाषणातून मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. जय भगवान महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश ढाकणे, जय भगवान महासंघाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अमोल नागरगोजे, समाज प्रबोधनकार शारदा मुंडे, श्रीकांत चौगुले, प्रकाश बंडेवार, कृष्णाजी खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती बाणेवार यांनी केले. तर, आभार प्रदर्शन मराठवाडा जनविकास संघाचे सहसचिव वामन भरगंडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here