पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर इथल्या आमदारांनी शहराची वाटणी करून घेतलीयं. पिंपरी हायवेच्या पलिकडे याचे आणि तिकडे त्याचे अशी वाटणी झाल्याचं ऐकलयं. महापालिकेत देखील बरीच भ्रष्टाचाराची प्रकरणे झाल्याच्या तक्रारी आहेत. आता इथल्या कारभारात काही काळंबेरे आढल्यास सोडणार नाही असा सज्जड दम राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलायं. शहरातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना अजितदादांनी नाव न घेता सुचक इशारा दिला आहे.

आकुर्डीत अजितदादा पवार यांनी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. त्यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, जेष्ठनेते आझमभाई पानसरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेविका मंगला कदम, उषा वाघेरे, शितल काटे, निकीता कदम, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, दत्ता साने, अजित गव्हाणे, मोरेश्वर भोंडवे, शाम लांडे, मयूर कलाटे, पंकज भालेकर, डब्बू आसवानी, राजू मिसाळ, रोहित काटे, माजी नगरसेवक जगदिश शेट्टी, प्रशांत शितोळे, किरण मोटे, मच्छिंद्र तापकीर तसेच सर्व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.

विधानसभा निवडणुक आणि महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर अजितदादा पवार आज पहिल्यांदाच शहरात आले होते. त्यांच्या उपस्थितीत आकुर्डीत पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा सत्कार अजित पवारांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. अजितदादा म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगिण विकास करूनही राष्ट्रवादीला महापालिका निवडणुकीत मतदारांनी नाकारले. महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली. पालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर इथल्या आमदारांनी शहराची वाटणी करून घेतलीयं. पिंपरी हायवेच्या पलिकडे याचे आणि तिकडे त्याचे अशी वाटणी झाल्याचं कानावर आलयं. महापालिकेत देखील बरीच भ्रष्टाचाराची प्रकरणे झाल्याच्या तक्रारी आहेत. घनकचरा प्रक्रीया प्रकल्प, कचरा उचलण्याचा करार, डस्टबिन टेंडर, वायसीएम घोटाळा, सोशल मिडीया एक्सपर्ट नियुक्ती, कृत्रीम पाणी टंचाई अशा अनेक प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे कळत आहे. मात्र यात काही काळंबेरे असल्याचं निष्पन्न झाल्यास महापालिकेत कारभार करत असलेल्यांना सोडणार नाही असा सुचक इशारा त्यांनी नाव न घेता आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here