पिंपरी :- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने पवनामाईची महाआरती करण्यात आली. सांडपाणी व प्रदुषण मुक्त जलपर्णी विरहित स्वच्छ सुंदर पवनामाई अभियानाच्या तिसऱ्या पर्वाची शुक्रवारी दि.१३ रोजी सायंकाळी ६ वाजता जिजाऊ पर्यटन केंद्र, मोरया गोसावी मंदिराशेजारी, चिंचवड येथे करण्यात आली. त्यानिमित्त शहराची जीवनदायनी असलेल्या पवनामाईची महाआरती संपन्न झाली.
या कार्यक्रमाला गेली २ वर्षे अविरतपणे पिंपरी चिंचवड मधील नदीचे प्रदूषण आणि संवर्धनावर काम करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि १०० सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी, इतर सामाजिक संस्था तसेच पाठीमागील २ वर्षात रोटरीला नदी स्वच्छतेसाठी सीएसआर फंडातून भरघोस निधी देणारे मेसर्स एक्साइड बॅटरीज उद्योग समूहाचे सीओ के अनिरुद्ध, एचआर मॅनेजर प्रफुल्ल जोशी आणि नीमा गिद्द मेसर्स सद्गुरू इंटरप्रायजेसचे मेनकर साहेब हिंजवडी, देश का सच्चा हिरो चंद्रकांत दामोदर कुलकर्णी,आर्किटेकट ओजस कुलकर्णी व आकांक्षा कुलकर्णी व पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो नदीप्रेमी यावेळी उपस्थित होते. यासर्वांच्या आजवरच्या योगदानासाठी रोटरी क्लबच्यावतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते पवनामाईची आरती करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जीवनदायिनी पवना नदी बद्दल नागरिकांमध्ये आत्मियता वाढावी, प्रेम वाढावे आणि त्याचबरोबर आपल्या कृतीतून नदीमध्ये कचरा अथवा कोणत्याही प्रकारचे प्लास्टीक, सांडपाणी टाकू नये अथवा सोडू नये अशा भावना प्रमुख पाहुण्यांनी यावेळी व्यक्त केल्या. इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या दर पौर्णिमेला वेगवेगळ्या घाटावर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी व इतर संस्थांच्या माध्यमातून महाआरतीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे क्लबचे प्रेसिडेंट ऍड.रो. सोमनाथ हरपुडे यांनी नमूद केले. याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थापक रो प्रदिप पोपटराव वाल्हेकर यांनी केले व आभार रो.राजेंद्र चिंचवडे यांनी मानले.