पिंपरी :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. https://pcpc.gov.in/ या वेबसाईटच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आता ऑनलाईन तक्रारी करता येणार आहे. पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. आर.के.पद्मनाभन हे पहिले पोलीस आयुक्त होते. तर संदीप बिष्णोई हे दुसरे आणि विद्यमान पोलिस आयुक्त आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांची नियुक्ती झाली. पदभार स्विकारल्यापासूनच त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्यात. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वेबसाईटचे उद्घाटन आज झाले आहे. या नव्या वेबसाईटच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन पोलिसांत तक्रार करता येणार आहे. तसेच सराईत गुन्हेगार, पोलिसांचे विविध उपक्रम यांची माहिती देखील या वेबसाईटवरून नागरिकांना मिळणार आहे.
हे संकेतस्थळ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केल्यामुळे ते मोबाईल, टॅब, आयपॅड या उपकरणांमध्ये सहजपणे ओपन केले जाऊ शकणार आहे. तसेच त्यामध्ये सायबर सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला आहे. ही वेबसाईट इंग्रजी तसेच मराठी भाषेमध्ये तयार करण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना तक्रार देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सिटीजन अलर्ट वॉलवर पोलिसांनी दिलेली माहिती नागरिक देखील पाहू शकणार आहेत. या वेबसाईटवर माहितीचा अधिकार, पोलीस भरती विषयक माहिती, पोलीस विभागाचे विविध उपक्रम, सुरक्षेबाबत दक्षता, शहरातील वाहतूक विषयक माहिती आदी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. या नव्या वेबसाईटवर पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध पोलीस शाखा व पोलीस स्टेशन अधिकारी यांचे संपर्क क्रमांक तसेच नागरिकांना नजीकच्या पोलीस स्टेशनची माहिती तात्काळ उपलब्ध होऊ शकणार आहे. पोलीस नियंत्रण कक्ष येथे मदतीकरिता विविध हेल्पलाईन्सची देखील माहिती देण्यात आली आहे.
अंध व्यक्तींना देखील स्क्रीन रीडर सॉफ्टवेअरच्या सहाय्याने ही वेबसाईट वापरणे सोपे जाणार आहे. लॉस्ट अँड फाउंड (हरवले/सापडले) या त्यावरुन नागरिकांना अति महत्त्वाची वस्तू हरवल्याची व सापडल्याची माहिती पोलिसांना तात्काळ घरबसल्या देता येणार आहे. या वेबसाईटवरून नागरिकांना भाडेकरूंची माहिती, हरवलेल्या व्यक्ती बाबतची माहिती, चोरीस गेलेली व बेवारस वाहने, अनोळखी मृतदेह, पोलीस पडताळणी सेवा इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध प्रकारचे परवाने मिळण्याकरिता विहित नमुन्यातील फॉर्म देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- सध्याचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग असल्याने तसेच सर्व नागरिक मोबाईल व इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत असल्याने त्यांना त्याद्वारे पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या वेबसाईटवर आवश्यक अशी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता विकसित केलेली ही वेबसाईट निश्चितच उपयोगी ठरणार आहे. नागरिकांनी पोलीस कामकाजासाठी सदर वेबसाईटचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा.
संदीप बिष्णोई
पोलीस आयुक्त – पिंपरी चिंचवड