साक्री : साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वीकृत संचालकपदी पंचायत समितीचे सदस्य तथा गटनेते उत्पल नांद्रे यांची निवड करण्यात आली. पंचायत समितीच्या सदस्यांमधून एका संचालकाची निवड केली जाते. सर्व सदस्यांमधून नांद्रे यांना संधी देण्यात आली आहे.
नांद्रे पेरेजपूर गणातून काँग्रेसकडून निवडून आले आहेत. बाजार समितीत संचालक म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहीते, बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे यांच्या शिफारशीने ही निवड करण्यात आली.
पंचायत समितीचा ठराव
नांद्रे यांची स्वीकृत संचालक म्हणून निवड व्हावी यासाठी पंचायत समितीच्या सर्व सदस्यांची बैठक झाली. सचिव तथा गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी सभागृहास निवडीबाबत सूचविले. त्यावर सर्व सदस्यांनी नांद्रे यांची नाव सूचविले. सदस्य विलास मावळी सूचक तर वासुदेव बदामे अनुमोदक होते.
सभापती संजय ठाकरे, उपसभापती रेखा बागूल व सर्व सदस्य उपस्थित होते. पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिल्याबद्दल नांद्रे यांनी आभार मानले.