पिंपरी:- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांसाठी कोणतीही मागणी नसताना बेंचेस् च्या खरेदीचा घाट घातला जात आहे. ठेकेदाराला पोसण्यासाठीच ही खरेदी केली जात असल्याचा संशय निर्माण होत आहे. त्यामुळे या बेचेंस् खरेदी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
नाना काटे यांनी यासंदर्भात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शिक्षण विभागामार्फत मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बाक (बेंच) खरेदी करण्यात आलेले आहेत. परंतु त्या बेंचचे अजून शाळांमध्ये वितरण करण्यात आलेले नाही. आज स्वत:नेहरुनगर येथील कोठारामध्ये भेट दिली असता कोठारामध्ये मोठे बेंच ३४० व छोटे बेंच ८४० अजून पडून असल्याचे दिसून आले. काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी जागे अभावी बेंच न देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे शाळांची मागणी नसताना बेंचेस् खरेदी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही किती बेचेंस् खरेदी करण्यात आले. त्याचे वाटप कोणत्या शाळेत करण्यात आले याची माहिती मागविली असता अद्यापही माहिती प्राप्त झालेली नाही.
त्यामुळे मागणी नसताना या बेचेंस् खरेदीमध्ये कोणाला जास्त रस आहे? ठेकेदार पोसण्यासाठी खरेदी केली जात आहे काय? असा संशय निर्माण होत आहे. व आता परत नविन बेंचेस् ची खरेदी प्रस्थावित असल्याचे समजते. म्हणजे ठेकेदारांसाठीच हि खरेदी होत आहे काय? तरी या बेचेंस् खरेदी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. व बेचेंस् अवाजवी खरेदी झाली असल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करुन त्याच्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.