प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग; एकुण १२६ उपकरणांचे सादरीकरण
साक्री – प्रचिती प्री प्रायमरी स्कूल आणि प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज साक्री येथे शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनासाठी विज्ञान व समाजशास्त्र या विषयांना अनुसरून विद्यार्थ्यांनी विविध संशोधनात्मक उपकरण (प्रोजेक्ट) सादर केले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते. इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे, प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेरच्या प्राचार्या वैशाली लाडे, शाळेचे व्यवस्थापक राहुल अहिरे तर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी राजेंद्र सुर्यवंशी (जीटीएस, आर्ट, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज), मनिषा पाटील – व्ही.यु.पाटील कॉलेज साक्री, सुनिल बच्छाव, रविंद्र शेवाळे आदी मान्यवर होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती माता, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. चंद्रयानाची प्रतिकृती अवकाशात प्रक्षेपण करून कार्यक्रमाचे आगळ्या- वेगळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. तद्नंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर, परिक्षकांनी शाळेतील विज्ञान प्रदर्शनाचे निरीक्षण केले. तसेच, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रदर्शनाची संकल्पना सादर केली. विज्ञान अभ्यास प्राथमिक स्थरापासूनच सुरु होतो. म्हणून प्री-प्रायमरीतील छोट्या चिमुकल्यांनी देखील सहभाग नोंदविला. नर्सरी ते यु.केजी मधुन एकूण २० उपकरणे सादर करण्यात आली होती. त्यामध्ये प्राणी, हेल्पर, वृक्ष आणि रोपे, जीवनचक्र, फुलपाखरे, सुर्य आदी उपकरणे मांडण्यात आले.
संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे. जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुखर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात. संशोधनाचे बिज विद्यार्थ्यांमध्ये रोवले जावे, या उद्देशाने विज्ञान प्रदर्शन्चे आयोजन करण्यात येते. संकुचित विचार बाजुला सारून मोठे काम करून दाखविण्याची दृष्टी विद्यार्थ्यांला येते. विद्यार्थ्यांचे विज्ञान शिक्षण त्याची विज्ञान आवड, कुतुहल जागृती, जिज्ञासापुर्ती आणि संशोधनवृत्ती जोपासणे इ. उद्देश विज्ञान प्रदर्शनामागे असतात, असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले.
प्री-प्रायमरी स्थरावर एकुण १२६ उपकरणांचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यात विज्ञानाचे ६६ व समाजशास्त्राचे ३० उपकरणे आले होते. (ॲसिड, रेन, हवा प्रदुषण, ध्वनी प्रदुषण, सोलर, हाऊस, रेन हार्वेस्टींग, फेसेस ऑफ मुन, दिवस आणि रात्र, थ्रीडी सोलर सिस्टीम, लेअर ऑफ एअर, वॉटर सायकल, देश आणि तेथील प्रसिद्ध स्थळे, घरांचे प्रकार, वृक्षांचे प्रकार) असे उपयोगी व आता भेडसावत असणाऱ्या समस्या दूर करणारे उपकरण विद्यार्थ्यांनी सादर केले. परिक्षणानंतर परिक्षकांनी वर्गानुसार क्रमांक काढले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माळीचकर यांनी केले. संयोजन मनन मिर्झा, वैष्णवी सोनवणे, पुनम पवार यांनी केले.