नवी दिल्ली – लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्रासाठी हा अभिमानास्पद क्षण असून मनोज नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस भारतीय लष्कराच्या सर्वोच्चपदी विराजमान झाला आहे. मनोज नरवणे देशाचे २८ वे लष्करप्रमुख ठरले आहेत. जनरल बिपीन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली असून आज ते लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त झाले आहेत. जनरल बिपीन रावत यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी लष्करात ३७ वर्ष सेवा बजावली असून, विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.
लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे नरवणे हे सेवा ज्येष्ठतेनुसार लष्कर प्रमुखपदाच्या स्पर्धेतील प्रमुख दावेदार होते. जगातील बलाढय़ लष्करांमध्ये गणल्या जाणाऱ्या भारतीय लष्करात १३ लाख अधिकारी-जवानांचा फौजफाटा आहे. लष्करप्रमुख म्हणून नेतृत्व करताना त्यांना ३७ वर्षातील सेवेचा अनुभव कामी येईल.