पिंपरी :- लैंगिकता म्हणजे केवळ शारीरिक संबंध नाही. लैंगिकतेबद्दल अनेक गैरसमज आणि चुकीच्या संकल्पना समाजात रूढ आहेत. अशा गैरसमजातून कौटुंबिक जीवनावर विपरित परिणाम होतो. लैंगिकता या विषयावर मनमोकळा संवाद होत नसल्याने लैंगिक समस्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. यासाठी या विषयावर आपल्या समस्या विनासंकोच तज्ज्ञ डॉक्टरांना सांगितल्या पाहिजेत, असे मत होमिओपथिक तज्ज्ञ (मानसिक व लैंगिक समस्या ) डॉ. ऊर्जिता कुलकर्णी यांनी व्यक्त केले. जोडीदार निवडताना दिखावूपणापेक्षा अनुरूपतेला महत्त्व असावे, असेही त्या म्हणाल्या.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दिशा सोशल फाउंडेशन व बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लग्न, नाते आणि सारे काही’ या विषयावर आयोजित मुक्तसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, समन्वयक नाना शिवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, अर्थशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अपेक्षा जाधव, प्रा. सुवर्णा खोडदे, डॉ.वंदना पिंपळे ,डॉ. क्रांती बोरावके आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. ऊर्जिता कुलकर्णी पुढे म्हणाल्या, लैंगिकता म्हणजे केवळ शारीरिक संबंध नाही ‘सेक्स’बद्दल अनेक गैरसमज व चुकीच्या संकल्पना असतात. स्त्रिया लैंगिक संबंधाबद्दल कधीही मनमोकळेपणाने बोलत नाहीत, त्यामुळे पुरुषांमध्ये ६० टक्के व स्त्रियांमध्ये ४० टक्के लैगिंक समस्याचे प्रमाण असल्याचे दिसते, त्याबरोबरच गैरसमजामूळे दोघांवरील लैगिक समस्येवरचा ताण वाढून त्याचे विपरीत परिणाम कौटुंबिक जीवनावर होतात. सुरक्षित संबंध कसे असावेत, सोशल मीडियाचा वापर करताना काय काळजी घ्यावी, याबद्दल त्यांनी विद्यार्थिनीना मार्गदर्शन करत मुलींचे रूपांतर स्त्रीमध्ये होताना होणाऱ्या  शारीरिक व मानसिक बदलांची सविस्तर माहितीही दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सविता वासुंडे यांनी केले. प्रा. सुवर्णा खोडदे यांनी आभार मानले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. दिपाली चिंचवडे यांनी करून दिला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी ‘लग्न, नाते आणि सारे काही’ हा विषय जितका संवेदनशील आहे, तितकाच महत्त्वाचा देखील आहे, असे सांगितले. विद्यार्थिनींनी आपल्यातील शारीरिक व मानसिक बदल यांच्याबद्दल पालक आणि डॉक्टर यांच्याशी  मुक्त संवाद साधावा. शंकांचे निरसन करून घ्यावे. विद्यार्थीदशेतच आपल्या विचारांची मानसिकता बदलणे महत्त्वाचे असते. डॉक्टरांकडून आपल्या समस्यांचे शंका निरसन होते आणि आपल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर देखील मिळते यासाठी विनासंकोच आपल्या समस्या डॉक्टरांना सांगितल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here