इतिहासा ! तू वळूनी पाहती पाठीमागे जरा, झुकवूनी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा

साक्री –  शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडविणारी एक धैर्यवान माता… राजमाता जिजाऊ, ” इतिहासा ! तू वळूनी पाहती पाठीमागे जरा, झुकवूनी मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा ” राजमाता जिजाऊ ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजी होत्या. ह्या दोन राजांना घडविण्यात या माऊलीचा सर्वात मोठा हात. आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस…

डोळ्या-समोर आदर्श असला की, आपल्या हातून महान कार्य घडू शकते, जीवनात ध्यान-धारणा यावर लक्ष केंद्रीत केल्यास आपल्यासमोर येणाऱ्या कुठल्याही संकटाला आपण सहज सामोरे जाऊ शकतो, असे प्रतिपादन प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अतुल देव यांनी  केले. शनिवार (दि.11 जानेवारी) रोजी स्कूलच्या प्रांगणात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमीत्त अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या भारती पंजाबी, समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे, गौरव विसपुते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी, शाळेचे शिक्षक मोहन गावित यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच, इयत्ता ८ वीच्या विद्यार्थीनी पल्लवी वाघ, राधिका देवरे, इयत्ता ६ वीचा विद्यार्थी निखिल काकुस्ते यांनी भाषणातून मनोगत व्यक्त केले.

प्राचार्य देव म्हणाले की, आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस… त्यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे लखुजी जाधव यांच्या घरी झाला. त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई ह्या जीजाऊंच्या माता. म्हाळसाबाई या निंबाळकर घराण्याच्या होत्या. लखुजी जाधवांना दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी हे चार पुत्र आणि जिजाऊ ही एककन्या अशी पाच अपत्ये होती. शिक्षण,तत्कालीन सुखवस्तू मराठा मुलीप्रमाणे जिजाऊंचे योग्य संगोपन करण्यात आले. त्या दांडपट्टा, अश्वारोहण वगैरे युद्ध कलांमध्ये देखील पारंगत होत्या.

जिजाऊंचा विवाह मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे डिसेंबर १६०५ साली मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. मालोजींना निजामशहाकडून पाचहजारी मनसब, शिवनेरी व चाकण हे किल्ले आणि पुणे व सुपे हे दोन परगणे जहांगीर म्हणून मिळाले. शहाजीराजांनी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यात सुरक्षित ठेवले.

 येथेच १९ फेब्रुवारी १६३० साली जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. जिजाऊंचे पती शहाजीराजे फार पराक्रमी सेनानी होते. त्यांनी पुण्याजवळील अहमदनगर व विजापूर प्रदेश काबीज करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले.

परंतु, विजापूरने ते उद्ध्वस्त केले. इ.स.१६३९ ते १६४७ या काळात शहाजी राजांनी पुण्यात झांबरे पाटलाकडून जागा विकत घेऊन लाल महाल नावाचा राजवाडा बांधला. जिजाऊ व शिवाजी यांचा मुक्काम लाल महालातच होता. जिजाऊंच्या आज्ञेत शिवाजी महाराज सवंगड्यासोबत युद्ध कला शिकू लागले. तान्हाजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बाजी ही शेतकऱ्यांची मुले शिवाजींचे जिवलग मित्र झाले. शिवाजीसह सर्वजण जिजाऊंच्या आज्ञेनुसार वागत असत. १६ मे १६४० साली जिजाऊंनी शिवाजीचा विवाह निंबाळकरांच्या सईबाईशी लावून दिला. यावेळी शहाजी विजापुरतर्फे बंगलोर येथे असल्यामुळे लग्नास येऊ शकले नव्हते. अशा रितीने जिजाऊंनी निंबाळकरांच्या मुलीच्या (सईबाई) सासू बनल्या. तर वणजोगी निंबाळकरांची मुलगी दीपाबाई (मालोजीची पत्नी) या जिजाऊंच्या सासू होत्या. २५ जुलै १६४८ साली ‘जिजा’ येथे शहाजी यांना कपटाने कैद केले. हे काम वजीर मुस्तफा खान याचे होते.

१६ मे १६४९ रोजी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीने शहाजींची सुटका केली. शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर १६५९ साली अफझलखानाचा वध केला आणि बाजी घोरपडेस ठार केले. मुस्तफाखानचे अगोदरच निधन झाले होते, अशा रितीने जिजाऊंनी पुत्र शिवाजी यांना आज्ञा करून पतीच्या अपमानाचा सूड घेतला. इ.स.१६५५ साली जिजाऊंचा ज्येष्ठ पुत्र संभाजी विजापूरतर्फे लढतांना मरण पावले. २३ जानेवारी १६६४ साली तुंगभद्रेच्या काठी होदेगिरी येथे शहाजी शिकारीला गेले असताना त्यांचा घोडा भर वेगात असतांना पाय रान वेलीत अडकला व घोड्यावरून पडल्यामुळे शहाजीराजांचे जीवन संपले.

जिजाऊ विधवा झाल्या, पण त्या सती गेल्या नाही. पुत्र शिवाजीने जिजामातेशी विचार विनिमय केला. त्या धैर्यशाली मातेचे आपल्या पुत्रास त्या कपटी औरंगजेबाच्या भेटीस आग्रा येथे जाण्यास संमती दिली. शिवरायांनी जिजाऊंच्या हाती राज्यकारभाराची सुत्रे सोपवली आणि ५ मार्च १६६६ साली राजगडवरून आग्राकडे प्रयाण केले. सिंहगड स्वराज्यात नाही याबद्दल जिजाऊ यांना फारच वाईट वाटत होते. त्यांनी शिवाजी यांना सिंहगड घेण्यास आग्रह केला.  तानाजी स्वप्राणाची आहुती देत सिंहगड ४ फेब्रुवारी १६७० साली काबीज केला. १७ जून १६७४ बुधवार रात्री जिजामातेने डोळे मिटले. महाराजांवरचे मायेचे छत्र हरवले. मराठा साम्राज्याचा प्रवर्तक पालनकर्ता आईविना पोरका झाला. अश्या या जिजाऊंच्या कार्याला आणि त्यांच्या त्यागांना मानाचा मुजरा. या राष्ट्र्मातेवर ज्या ठिकाणी संस्कार झाले ते ऐतिहासिक स्थळ म्हणजे सिंदखेडराजा. आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते. दरवर्षी येथे जिजाऊंच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘जिजाऊ महोत्सव सोहळा’ साजरा केला जातो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोकुळ गोविल यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here