Chaupher News
पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर दरम्यानच्या पवना नदीवरील समांतर पुलाच्या कामाची निविदा अखेर प्रसिद्ध करण्यात आली. भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी या पुलाच्या कामासाठी सातत्यपूर्ण शासन दरबारी पाठपुरावा केला होता. अखेर आज त्यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील कित्येक वर्ष रखडलेल्या पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर दरम्यानच्या नदीवरील समांतर पुलाचे काम मार्गी लागले असून स्थापत्य विभागामार्फत त्याची १२,५६,५७,.५१८/- (बारा कोटी छप्पन्न लाख सत्तावन हजार पाचशे अठरा) रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर निविदेची प्री बीड मीटिंग ही ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असून निविदा भरण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी असेल.
पिंपरीतील भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी या पुलाच्या कामासंदर्भात तब्बल तीन वर्षांपासून आयुक्त आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून सदर काम तात्काळ सुरू करण्याची वारंवार मागणी केली होती. तसेच सातत्याने यासाठी शासन दरबारीही पाठपुरावा केला होता.
नगरसेवक वाघेरे म्हणाले की, गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, काटे पिंपळे या गावांमधील लोकवस्ती आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याअनुषंगाने वाहनांची रहदारीमध्येही वाढ झाल्यामुळे या गावांना जोडणारा जुना पूल अपुरा पडत होता. सदर पुलाचीही दुरावस्था झाली असून पुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना धोकादायक पद्धतीने वाहन चालवावे लागते. तसेच या पुलावर संध्याकाळच्या वेळी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असल्याने त्याचा मनस्ताप वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत होता. परंतु आता लवकरात लवकर सदर समांतर पुल उभारण्यात येईल व त्यामुळे या सर्व समस्या मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदर पुलास ६ मीटर X १४’ मीटरच्या प्रेक्षणीय गॅलरी करण्यात येणार आहे सदरची गॅलरी व पुलाच्या सुशोभिकरणाची संकल्पना नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सुचविलेल्या सुचनेनुसार तयार करण्यात आली आहे. प्रेक्षक गॅलरी असणारा पिंपरी चिंचवड शहरातील पहिलाच पुल होत आहे. सिंधी समाजातील संत झुलेलाल यांना माननारा मोठा वर्ग नदीतील माशासाठी अन्नदान करत असतो सततच्या रहदारीमुळे या नागरिकांना व प्रेक्षकांना ञास होऊ नये म्हणून संदीप वाघेरे यांनी सदरचा प्रस्ताव दिला होता.