Chaupher News
विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान मिळावे व ज्या पालकांना काही कठीण कारणास्तव आपले बालपण मनसोक्त जगता आले नाही अशा पालकांना घटिकाभर विश्रांती व मनोरंजनाचा आनंद मिळावा यासाठी ‘पांझरा थंडी’ नावाने आनंद उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन प्रचिती स्कूलचे चेअरमन प्रशांत पाटील यांनी केले.
कावठे ( ता. साक्री, जि. धुळे ) येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व जुनिअर कॉलेजच्या प्रांगणात ‘पांझरा थंडी’ अंतर्गत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरु ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा लतिका नागरे, नवडण्याच्या सरपंच वर्षा ठाकरे, साक्री पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सद्स्या रोहिणी अकलाडे, जयश्री देवरे, शाळेचे प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, समन्वयक वैभव सोनवणे, तुषार देवरे आदी उपस्थित होते.
प्रशांत पाटील म्हणाले, आपल्याला बालपणाचा आनंद घेता आला नाही त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना त्यांचे बालपण त्यांच्या पद्धतीने जगता यावे यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासाला चालना मिळेल. त्यासाठी असे मेळावे भरवणे ही काळाची गरज आहे. तसेच ‘फन फेअर’ पेक्षा ‘पांझरा थंडी’ स्थानिक हे स्थानिक भाषेतील नाव या उत्सवाला योग्य न्याय देईल, असेही ते म्हणाले.
मेळाव्यात पालकांनीही सहभागी होत विविध खाद्यपदार्थांचे स्टॊल लावले होते. यावेळी चालता -बोलता प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम शिक्षिका मनीषा बोरसे व शुभांगी अहिरे यांनी घेतला. सूत्रसंचालन स्मिता नेरकर यांनी केले.