Chaupher News
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात लवकरच वैयक्तिक प्रॉपर्टी कार्डची योजना सुरू करण्यात येणार आहे. याबाबत नियमावली तयार करण्याचे काम सुरू असून, पुढील तीन महिन्यांत त्यांची अमंलबजावणी करण्यात येणार आहे.
तत्कालीन भाजप सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र, त्याची नियमावली अद्याप तयार न झाल्याने या योजनेची सुरुवात होऊ शकली नाही. आता नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. वैयक्तिक पातळीवर दिल्या जाणाऱ्या प्रॉपर्टी कार्डसाठी फ्लॅटधारकाकडून एक हजार रुपये आकारण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज केल्यानंतर साधारणपणे एक ते दीड महिन्यात हे कार्ड देण्यात येणार आहे.
फ्लॅट, बंगला असणाऱ्या नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या प्रॉपर्टी कार्डमध्ये संबंधित जागेची सर्व माहिती असेल. त्यात मालकाचे नाव, बांधकाम क्षेत्र, युनिट क्रमांक, बांधकाम परवानगी दिलेल्या संस्थेचे नाव, इमारतीच्या बांधकामाचे वर्ष, जागेच्या मूळ मालकाचे नाव, इमारतीचा पुनर्विकास झाला असल्यास त्याचा तपशील असणार आहे. शेतजमिनीच्या मालकीची नोंद असणारा सात बारा उतारा असतो. तशाच प्रकारे घराचा मालकी हक्क या कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे.