Chaupher News

पुणे : गरिबांना अल्पदरात जेवण देण्याच्या उद्देशाने प्रजासत्ताक दिनापासून पिंपरीत ४ तर पुण्यात ७ अशा ११ ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली जाणार आहे. रविवारी (२६ जानेवारी) सकाळी अकरा वाजता उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतील उपाहारगृहात या योजनेचे उद्घाटन करण्यात येईल.

राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यास गरिबांना दहा रुपयांत जेवण उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यात ११ ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. तयार स्वयंपाकगृह आणि २५ माणसे एकाचवेळी जेऊ शकतील, अशी व्यवस्था असणाऱ्यांना या योजनेचा ठेका देण्यात आला आहे. आगामी काळात बचतगट, खाणावळी, भोजनालये येथे ही योजना सुरू करण्यात येईल.

या योजनेअंतर्गत जेवण घेणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांक घेण्यात येणार आहे. त्यासाठी चालकाला शासनाकडून ‘महा अन्नपूर्णा ’ हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रात रोज किमान ७५ आणि कमाल १५० जणांनाच या योजनेअंतर्गत जेवण देण्यात येईल. रोज दुपारी बारा ते दोन या वेळेतच ही योजना कार्यान्वित राहणार असून एका व्यक्तीला एकच थाळी मिळणार आहे.

केंद्रचालकांना शासनाकडून प्रत्येक थाळीमागे ४० रुपये अनुदान मिळणार असून दहा रुपये ग्राहकाकडून मिळणार आहेत. या योजनेसाठी पुणे शहर अन्नधान्य पुरवठा विभागाला ५४ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे, अशी माहिती शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी शुक्रवारी दिली. हे अनुदान पुरवठा विभागाकडून चालकाच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. अनुदान १५ दिवसांनी किंवा महिनाअखेरीस देण्यात येणार असून त्याबाबतचे निर्देश अद्याप शासनाकडून प्राप्त झालेले नाहीत, असेही मोरे यांनी सांगितले.

शिवभोजन थाळी कुठे मिळेल?

पुण्यात पुणे महानगरपालिकेतील हॉटेल निशिगंधा, कौटुंबिक न्यायालय, कात्रज कॉर्नर येथील जेएसपीएमचे उपाहारगृह, स्वारगेट एसटी स्थानक, गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डमधील समाधान गाळा क्र. ११, महात्मा फुले मंडई, हडपसरमधील गाडीतळ येथील शिवसमर्थ भोजनालय, पिंपरी चिंचवड येथे पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपाहारगृह, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, वल्लभनगर बसस्थानक, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण येथे शिवभोजन थाळी मिळेल. या सर्व ठिकाणी योजनेचे फलक दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. गरीब कोणाला म्हणावे, याबाबत व्याख्या करता येणार नसल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर या योजनेंतर्गत जेवणाचा लाभ सर्वाना द्यावा, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व पुरवठा अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here