Chaupher News
महाविकास आघाडी २०२४ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढली तर शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात असं शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
काय म्हणाले आहेत रोहित पवार?
“साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. लोकसभेच्या वेळी म्हणजेच २०२४ ला एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडी जशी राज्यात एकत्र आहे तशी देशातही एकत्र लढली तर आपण सर्वांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. महाराष्ट्रात सगळं राजकारण आता सोपं झालं कारण महाविकास आघाडी झाली आहे. जर लोकसभेतही आपण एकत्र लढलो तर एक मराठी माणूस पंतप्रधानपदी बसू शकतो. शरद पवार यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. पवारसाहेब जेव्हा कुठेही जातात तेव्हा सामान्य लोकांना काय पाहिजे ते ओळखून घेत असतात. साहेबांचा लोकांवर विश्वास आहे. लोकांचा साहेबांवर विश्वास आहे.”असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांना टोला
जर एखाद्या नेत्याचा लोकांवर विश्वास नसेल तर त्या नेत्याला एखाद्या ठिकाणी एखाद्या पत्रकाराशी बोलतानासुद्धा आपले बूट हातात घ्यावे लागतात. अशा प्रकारचा विश्वास आपल्याला नको. आपल्याला खरा विश्वास हवा आहे असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोलाही लगावला आहे. पंकजा मुंडे यांनी एक दिवसाचं जे लाक्षणिक उपोषण केलं होतं, त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे हातात बूट घेऊन निघाले होते. त्यावरुन रोहित पवार यांनी हा टोला लगावला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही
“भाजपा नेते महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की किती प्रयत्न केले तरीही यश मिळणार नाही. त्यांनी आशेवर राहू नये. सुधीर मुनगंटीवार यांनी अशी आशा अनेकदा व्यक्त केली. मात्र त्यांना यश मिळणार नाही” असाही टोला रोहित पवार यांनी लगावला.