पिंपरी : जास्त व्याजाचे आमिष दाखविणार्‍या पतसंस्था या डबघाईला आलेल्या असतात, त्यामुळे अशा पतसंस्थेत गुंतवणूक करताना ठेवीदारांनी सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे सहकार, पणन, वस्त्रउद्योगमंत्री सुभाष (बापू) देशमुख यांनी व्यक्त केले. शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या भोसरीतील नूतन कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यानिमित्त भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. गणेश महाराज वाघमारे होते. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार विलास लांडे, शिक्षण मंडळाचे सभापती निवृत्ती शिंदे, नगरसेवक संजय वाबळे, महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा गोफने, नगरसेविका सुरेखा गव्हाणे, जनसेवा बँकेचे ऍड. सतीश गोरडे, सचिन यादव, भरत घंगाळे, एम. डी घंगाळे, भगवंत गटकळ, सयाजी आवटे, महेंद्र शहा, नंदकुमार हडवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले की, ज्या पतसंस्थेच्या वार्षिक सभा ह्या कमी कालावधीत गुंडाळल्या जातात तेव्हा गुंतवणूकदारांनी सावध होणे गरजेचे आहे. याउलट ज्या वार्षिक सभा ह्या खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडतात, जिथे सभासदांच्या शंकांचं निरसन केलं जातं त्या पतसंस्था चांगल्या आहेत असं गृहीत धरण्यास हरकत नाही. सहकाराच्या शुध्दीकरणाशिवाय गावपातळीवर सुधारणा होणे अवघड आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने सहकाराचे शुद्धीकरण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रुपी बँकेतील ठेवीदारांच्या संपूर्ण ठेवी परत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here