Chaupher News

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका वृक्षसंवर्धन विभागाचा सन 2020 – 21 या आर्थिक वर्षाचा 32 कोटी 3 लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर झाला आहे. 25 लाख रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे.

महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन करणे अधिनियमांतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका वृक्ष संवर्धन विभागाने सन 2020-21 चा वार्षिक अर्थसंकल्प तयार केला आहे. या अर्थसंकल्पात सन 2019-20 च्या सहा महिन्यातील प्रत्यक्ष जमा – खर्चाच्या तसेच सहा महिन्याच्या जमा – खर्चाची अंदाजे रक्कम नमूद केली आहे. त्यानुसार, सन 2019-20 चा सुधारीत 28 कोटी 67 लाख 16 हजार रुपये आणि सन 2020-21 चे मूळ 32 कोटी 3 लाख 81 हजार रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर मांडला आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर वृक्ष प्राधिकरणाचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे सादर होईल.

आगामी वर्षात 7 कोटी 50 लाख रुपयांचा वृक्षकर तर बँक व्याजातून 4 कोटी, वृक्ष अनामत रकमेतून 11 कोटी आणि रोपे विक्रीतून 2 लाख रुपये जमा होईल, असा अंदाज आहे. सहजासहजी मिळणा-या या रकमेमुळे आगामी वर्षाचा अर्थसंकल्प 32 कोटी 3 लाख 81 हजार रुपयांवर पोहोचला आहे. गतवर्षी हा अर्थसंकल्प 28 कोटी 67 लाख रुपयांचा होता.

खर्चाच्या बाजुला नर्सरी साहित्य देखभाल – दुरुस्ती (8 लाख), फळाफुलांचे प्रदर्शन (30 लाख), झाडांचे पुनर्रोपण (40 लाख), खड्डे खोदाई (2 कोटी), वृक्ष प्राधिकरण सदस्यांचा दौरा (30 लाख), नामफलक खरेदी व दुरुस्ती (10 लाख), पिंजरे दुरुस्ती (25 लाख), वृक्ष गणना ( 2 कोटी 50 लाख), ताराकुंपण देखभाल – दुरुस्ती (50 लाख), पिंजरे खरेदी (60 लाख), झाडे रोपे व बियाणे खरेदी (2 कोटी ), वृक्षसंवर्धन विभागाची विविध कामे करणे ( 1 कोटी ), ठेकेदारी पद्धतीने वृक्षसंवर्धन (1 कोटी), पाणीपुरवठा विषयक कामे ( 1 कोटी ), दुर्गादेवी उद्यान देखभाल (75 लाख), गायरान आणि मोकळया जागांवर वृक्षारोपण करणे ( 1 कोटी ), गायरान आणि मोकळया जागांअंतर्गत रस्ते करून वृक्षारोपण करणे (3 कोटी), वृक्ष रोपण – संवर्धन (5 कोटी), बेंचेस खरेदी (25 लाख) आणि रस्ते सुशोभीकरण (4 कोटी) या कामांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here