चिकसे : साक्री तालुक्यातील चिकसे येथील देगाव रस्त्यावर असलेला शेतात वन्यप्राण्याने शेळीवर हल्ला चढविल्याची घटना घडली आहे. धनराज पोपट खैरनार यांच्या शेतात ही घटना घडली.
वन्यप्राण्याने मध्यरात्रीच्या सुमारास घराजवळ बांधलेल्या शेळीवर हल्ला केला. मात्र, कुत्र्यांच्या भुंकण्याने मैनाबाई पोपट खैरनार यांना जाग आली. यावेळी आरडाओरड झाली तसेच शेळीला बांधलेला दोर न तुटल्याने प्राणी पळून गेला. मात्र, हल्ला करणारा प्राणी बिबट्या होता की तरस? हे ओळखता आले नसल्याचे मैनाबाई खैरनार यांनी सांगितले. पशुवैद्यक मुकेश कापसे यांनी जखमी शेळीवर उपचार केले. शेळीच्या मानेवर खोलवर दात गाडले गेले असले तरी नियमित औषधोपचाराने शेळी बरी होईल, असे डॉ. कापसे यांनी सांगितले. धनराज खैरनार राहत असलेला मळा चिकसेपासून एक किमी अंतरावर देगाव रस्त्याला लागून आहे. पहिल्यांदा एखाद्या वन्यप्राण्याने गावाजवळ येऊन पशुधनावर हल्ला केल्याची घटना घडल्याने शेतकर्यांसह ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.