Chaupher News

योकोहामा : जपानच्या ‘डायमंड प्रिन्सेस’ या क्रूझ जहाजावरील तिसऱ्या भारतीयाला करोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जपानमधील भारतीय दूतावासाने या बातमीला दुजोरा दिला आहे.

‘डायमंड प्रिन्सेस’ या क्रूझवर १३८ भारतीय आहेत. त्यातील दोन भारतीयांना करोना विषाणूची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले होते. दरम्यान, जपान सरकारने जहाजावरील काही प्रवाशांना स्वतंत्र कक्षात स्थलांतरीत होण्यासाठी जहाज सोडण्यास परवानगी दिली आहे.जहाजावर करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २१८ झाली आहे. अजूनही हजारो प्रवाशांना जहाजावरील स्वतंत्र कक्षात ठेवले आहे. या जहाजावर ३७०० प्रवासी आहेत. त्यांत ‘सीओव्हीआयडी १९’ प्रकारच्या करोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

ज्या वयोवृद्धांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आणि ज्यांचे वय ८० च्या पुढे आहे, अशांना जहाजावरून आरक्षित केलेल्या ठिकाणी राहण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर एका बंदिस्त बसमधून शुक्रवारी त्यांना नियोजित ठिकाणी नेण्यात आले.जपानचे वरिष्ठ आरोग्यमंत्री गाकू हाशिमोटो यांनी शुक्रवारी जहाजाला भेट दिली. ते म्हणाले, जहाजावरील प्रवाशांमध्ये संसर्गाची लक्षणे आढळल्यास त्यांची चाचणी करण्यात येईल. चाचणीत संसर्ग झाल्याचे आढळल्यास रुग्णालयात दाखल करण्यात येईल. तसेच संसर्ग नसलेल्या प्रवाशांना त्यांच्या मागणीनुसार जपान सरकारने राखून ठेवलेल्या ठिकाणी पाठवण्यात येईल. जपानचे आरोग्यमंत्री काटसुनोबू काटो यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात दहा जण गंभीर अवस्थेत असून त्यांना अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवले आहे. प्रवासी आणि कर्मचारी यांना १४ दिवस एकमेकांपासून वेगळे ठेवण्यात आले आहे. १९ फेब्रुवारीपर्यंत त्यांना वेगळे ठेवण्यात येणार आहे.

तिघाही भारतीयांची प्रकृती स्थिर

‘डायमंड प्रिन्सेस’ या क्रूझवर १३८ भारतीय आहेत. त्यातील दोन भारतीयांना करोना विषाणूची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले होते. या तिघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे भारतीय दूतावासाच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे. दूतावास जहाजावरील भारतीयांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.


चीनमध्ये ‘करोना’चे १,५०० बळी
बीजिंग : चीनमध्ये करोना विषाणूची लागण झाल्याने आतापर्यंत सुमारे दीड हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात हुबेई प्रांतात अलीकडे झालेल्या १२१ मृत्यूंचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या विषाणूची लागण झाल्याचे निश्चित झालेल्या चीनमधील रुग्णांची संख्या आता ६५ हजारांवर पोहोचली आहे.करोनाच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या हुबेई प्रांतात गुरुवारी या विषाणूच्या बाधेमुळे ११६ जणांचे बळी गेले. याच दिवशी करोनाची लागण निश्चित झालेले आणखी ४८२३ रुग्ण नोंदले गेले, अशी माहिती या प्रांताच्या आरोग्य आयोगाने शुक्रवारी दिली. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देशात करोनाचे नवे ५०९० रुग्ण आढळून आल्याने या विषाणूची लागण झालेल्यांची संख्या ६४ हजार ८९४ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here