Chaupher News

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील शहर अभियंता ते कनिष्ठ अभियंता, आरेखक या पदावर 26 जणांना पदोन्नती देण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पदोन्नती समितीची बैठक पार पडली. त्यात महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील डिग्री आणि डिप्लोमाधारकांचा वाद मिटवण्यासाठी एकास एक पदानुसार पदोन्नती देण्यात आल्या आहेत. मात्र, पदोन्नती समितीचे मिनिट्स पुर्ण करुन त्याला आयुक्तांची अंतिम मान्यता घेतल्यानंतरच संबंधिताना पदोन्नतीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात येणार आहेत.

महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग एक ते चार मधील अधिकारी व कर्मचा-यांना पदोन्नती देण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली डीपीसी समिती कार्यरत आहे. या समितीत आयुक्त, प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त, मुख्य लेखाधिकारी, मुख्य लेखा परिक्षक, मागासवर्गीय प्रतिनिधींचा समावेश असतो. त्या समितीची बैठक वारंवार पुढे ढकलली जात असल्याने अभियांत्रिकी विभागाच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या.

महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातून आरेखक, कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, सहशहर अभियंता आणि शहर अभियंता पदाबाबत खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देण्यासाठी पालिकेच्या पदोन्नती समितीत 26 जणांचे प्रस्ताव प्रशासनाने दाखल केले होते. त्यात आरक्षित एससी,एसटी,ओबीसी प्रवर्गातील पदोन्नती जागा राखीव ठेवून पदोन्नती करण्यात आलेली नाही.

महापालिकेतील मंजूर असलेल्या रिक्त पदावर तात्काळ पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी अभियंता वर्गातून सतत होत आहे. त्यानूसार प्रशासन विभागाने हे 26 जणांचे प्रस्ताव तयार केलेले होते. त्यात शहर अभियंता, सहशहर अभियंता प्रत्येकी एक, कार्यकारी अभियंता पदाच्या 10 पैकी 6 जागा, उपअभियंता पदाच्या 17 पैकी 10 जागा, कनिष्ठ अभियंता पदाच्या 13 पैकी 8 जागा, आरेखक 2 जागा अशा एकूण 26 पदांच्या पदोन्नती समितीत निर्णय घेण्यात आलेला आहे.

दरम्यान, अभियांत्रिकीच्या पदोन्नतीतील आरक्षित जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यात कार्यकारी अभियंता 4 जागा, उपअभियंता 7 जागा, कनिष्ठ अभियंता 5 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या जागा सुप्रिम कोर्टच्या आदेशामुळे भरलेल्या नाहीत. त्यामुळे येत्या दोन दिवसात पदोन्नती समितीचे मिनिट्स पुर्ण झाल्यानंतर त्यांना पदोन्नती मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here