Chaupher News
चिखली : विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यालाही अवघड जावा असा विषय म्हणजे पेटंट. मात्र, येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये लहानमुलांसाठी चक्क पेटंट या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि विद्यार्थ्यांनीही या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शाळेच्या संचालिका कमला बिष्ट प्रास्ताविकात म्हणाल्या, लहान मुलांना जसे प्रश्न पडतात तशाच प्रकारे अनेक प्रश्नांंची उकल लहान मुले चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यासाठी गरज असते ती त्यांच्या विचारांना योग्य दिशा देण्याची त्यामुळेचे शाळेतर्फे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.
त्यानंतर पेटंटसाठी प्रसिद्ध प्रा. सुदर्शन देशमुख यांचे स्वागत करण्यात आले. सध्या त्यांच्या नावावर दोन पेटंट असून आणखी पाच आंतरराष्ट्रीय पेटंट सादर केले आहेत. त्यांनी अर्ज केला आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी, पेटंट म्हणजे काय? नवीन विचाराला चालना कशी द्यायची? वास्तविक जीवनातील प्रश्नांची उकल करत असताना अनेक नवीन नवीन पद्धतींचा अवलंब करावा याची माहिती दिली. तसेच या पद्धतींचा उपयोग करून नवीन शोध लावतात किंवा एखाद्या समस्येचे समाधान शोधतात, त्यांना शास्त्रज्ञ म्हणतात, असे त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत समजावून सांगितले.
दातांची स्वच्छता किती आहे. हे सांगणारे मोबाईल अॅप एका मुलाने तयार केले आहे. तसेच हेल्मेटमुळे उन्हाळ्यात गरम होते. यावर काय उपाय करता येतील. लहान मुलांनी समस्येवर तोडगा काढताना शिक्षक व पालकांची कशी मदत घ्यावी यावर चर्चा करण्यात आली. पुढच्या कार्यशाळेच्या टप्प्यापर्यंत विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात आढळणार्या 3 समस्यांवर पालकांशी चर्चा करून त्या लिहून आणण्याचा अभ्यासही यावेळी देण्यात आला.