Chaupher News
पिंपरी : माणसाच्या आयुष्यात गुणवत्तेचा फार मोठा वाटा आहे. गुणवत्ता असण्याकरिता आणि आपल्या कोणत्याही कृतीमध्ये गुणवत्ता आणण्यासाठी मनात त्याची जाणीव निर्माण होणे आवश्यक असते. लोकांमध्ये ही जाणिव निर्माण करण्यासाठी तीस वर्षांपासून प्रोफेसर रमेश कासेटवार (निवृत्त कर्नल) हे काम करीत असून “बीएसके गुणवत्ता जाणीव जागृति संस्था” ही जगातील पहिली संस्था त्यांनी मावळमध्ये स्थापन केली आहे.
आपले कोणतेही काम गुणवत्तापूर्ण हवे ही जाणीवच माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू शकते. वस्तू किंवा सेवेच्या बाबतीत देखील हेच तत्व गरजेचे असते. आपण देत असलेली सेवा किंवा वस्तू गुणवत्तेने परिपूर्ण असली पाहिजे ही भावना आपल्या मनात असेल तरच आपण प्रगती करु शकतो. हीच बाब सर्वसामान्य लोकांच्या मनात बिंबवणे गरजेचे असते. हे तत्व हेच आपले ध्येय मानून प्रोफेसर कासेटवार काम करीत आहेत.
वडगाव मावळ जवळील जांभूळ या गावाजवळील व्हिजन सिटी येथे प्रा. रमेश कासेटवार यांनी बीएसके गुणवत्ता जाणीव जागृति या संस्थेची स्थापना केली असून त्याच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांना गुणवत्तेशी संबंधित शिक्षण देणे हे त्यांनी उद्दीष्ट ठेवले आहे. शिक्षण क्षेत्र, विविध प्रकारच्या सामाजिक घटना किंवा संघटना, औद्योगिक क्षेत्राशी संबंधित गुणवत्तेशी संबंधित सर्व प्रक्रियेंवर प्रशिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना केली असून त्याचा फायदा समाजातील सर्वच स्तरातील लोकांना होणार आहे.