Chaupher News

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील एकविरा मंदिर परिसराचा विकास, कार्ला भाजेलेणी, राजमाची, लोहगड, विसापूर किल्ल्यांचे संवर्धन आणि विकास केला जाणार आहे. मावळातील ऐतिहासिक वारसा जपला जाईल. पर्यटकांना सक्षमपणे सुविधा पुरविण्यात याव्यात. त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने मावळातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या संवर्धन, विकासाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात गुरुवारी (दि.20) बैठक पार पडली. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, पर्यटन सचिव दिलीप गावडे , मावळचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के, पुरातत्व विभागाचे सहाय्यक अधीक्षक रवीराज, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता वैशाली भुजबळ, जिल्हानियोजन अधिकारी प्रमोद कभवी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, “मावळ तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. राज्यासह देशभरातून लाखो पर्यटक मावळ मधील ऐतिहासिक ठिकाणे आणि पर्यटन स्थळाला भेट देतात. या पर्यटन स्थळांचा विकास व्हावा. तसेच ठाकरे परिवाराची कुलदेवता असलेल्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक येत असतात. मंदिर परिसराचा विकास व्हावा या हेतूने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना बैठक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
कार्ला फाटा ते वेहरगांव या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, मंदिर पायथा ते वेहरगांव या रस्त्याचे काम करणे, मंदिर पायथा ते कार्ला लेणी पर्यंतच्या पायऱ्यांची दुरुस्ती करून बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, पुष्प भांडाराची व्यवस्था, पायी मार्गावर लाईट व्यवस्था वाहनतळ, एकविरा देवीच्या पायथ्याशी उद्यानाची निर्मिती या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याबरोबरच राजमाची किल्ल्याकडे जाणारा १३.५ किलोमीटरचा रस्ता करणे. लोहगड, विसापूर या किल्याच्या मार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती करणे. त्याचबरोबर पर्यटकांना सोयी सुविधा पुरविणे. भाजेलेणीकडे जाणारा रस्ता पुरातत्व विभागाने सादर केलेल्या आराखड्यातील खर्चावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मावळ तालुक्यातील येणाऱ्या पर्यटकांना सुविधा पुरविण्याच्या सूचना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here