Chaupher News
अकोला : ‘प्रहार जनशक्ती पक्षा’चे अकोला जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अकोट शहरातील कबुतरी मैदानाजवळच्या पोलिस वसाहतीमध्ये शुक्रवारी रात्री त्यांच्यावर दोघा अज्ञातांकडून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. घटनेनंतर त्यांना तत्काळ अकोला येथे हलविण्यात आले होते. परंतु, रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हे त्यांच्या खुमकर दूध डेअरीच्या बाहेर शुक्रवारी रात्री दहा-साडे दहाच्या सुमारास मोबाईलवर बोलत वसाहतीत चालले होते. या ठिकाणी दोन दुचाकीस्वार त्यांच्याकडे येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांना हल्ल्याची कुणकुण लागताच ते पोलीस वसाहतीकडे पळाले. मात्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. यात त्यांना पाठीत दोन गोळ्या लागल्या. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने पोलिस कर्मचाऱ्यांनी समोर असलेल्या डॉ. सुरेश व्यवहारे यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. या ठिकाणी त्यांची प्रकृती बिघडल्याने आणि रक्तस्त्राव झाल्याने त्यांना अकोला येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.