Chaupher News

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील जनसंपर्क कार्यालय तोडफोड प्रकरणातील ख-या गुन्हेगारांची नावे समोर आली आहेत. त्यामागे भाजपच्या बड्या नेत्यांचा हात असून या प्रकरणाचा तपास दडपण्यासाठी पोलिसांसोबत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप दत्ता साने यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

7 जून 2019 रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सहा ते सात हल्लेखोरांनी साने चौक, चिखली येथील दत्ता साने यांचे जनसंपर्क कार्यालय फोडले. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली. त्यातील मुख्य आरोपी वगळता अन्य सर्व आरोपी जामिनावर सुटले आहेत. हा हल्ला राजकीय सूडापोटी झाला असून पोलिसांनी तपासामध्ये या प्रकरणाला वेगळे वळण दिल्याचा आरोप साने यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे या प्रकरणातील पुरावे आपण सादर केले आहेत. या हल्ल्याची सुपारी मुख्य सूत्रधार आमदारांचा कार्यकर्ता पांडुरंग बाळासाहेब साने याच्या माध्यमातून रावण टोळीचा हस्तक दिनेश रेणवा याला देण्यात आल्याचा आरोप साने यांनी केला. दिनेश रेणवा हा पांडुरंग साने यांचा जवळचा मित्र आहे. याचेही पुरावे पोलीस आयुक्तांकडे दिल्याचे साने यांनी सांगितले.

दत्ता साने म्हणाले, महापालिकेत विरोधी पक्षनेता असताना आमदार महेश लांडगे यांची अनेक प्रकरणे उजेडात आणली. त्यातच भोसरी विधानसभेतून मी 2019 च्या निवडणुकीसाठी इच्छुक होतो. माझी राजकीय कारकीर्द संपवण्याच्या हेतूने हा प्रकार घडवला. या प्रकरणात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत पोलिसांवर दबाव आणून तपासाची दिशा बदलण्यात आली. तसेच, या प्रकरणात पोलिसांसोबत मोठा आर्थिक व्यवहार झाला, असेही साने यांनी सांगितले.

पोलीस आयुक्तालयासमोर उपोषणाला बसणार

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. सर्व आरोपींची नार्को टेस्ट करावी. हा तपास पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात यावा. या मागणीसाठी मी सोमवारी (दि. 2) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे, असेही दत्ता साने यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here