Chaupher News

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नदी पात्रातील संपूर्ण जलपर्णी काढण्यात येणार आहे. या तीनही नद्यांमधील जलपर्णी काढण्यासाठी सव्वादोन कोटी रूपये खर्च होणार आहे. त्यासाठी महापालिकेमार्फत पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

पवना नदीचे पात्र 24 किलो मीटर, इंद्रायणीचे 19 आणि मुळा नदीचे 10 किलो मीटर आहे. शहराची दिवसेंदिवस होणारी वाढ आणि औद्योगिकीकरण यामुळे या नद्यांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. त्यातच या नदीपात्रांमध्ये जलपर्णीही बेसुमार वाढल्या आहेत. या जलपर्णी काढून नदीपात्र नियतिपणे स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.

महापालिकेच्या ‘अ’, ‘ब’, ‘ड’, ‘ग’ आणि ‘ह’ या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पवना नदीतील जलपर्णी काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सांगवडे – किवळे पूल ते दापोडी संगमापर्यंत पवना नदीचे संपूर्ण पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या ‘क’, ‘फ’ आणि ‘इ’ या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून वाहणा-या इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यात येणार आहे. त्यामध्ये आयटी पार्क निघोजे पुल ते कुदळवाडी, चिखली येथील स्वराज रेसिडेन्सी तसेच तेथून डुडुळगाव स्मशानभुमी समोरील बंधा-यापर्यंत इंद्रायणी नदीचे संपूर्ण पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे.

मुळा नदीपात्रातील वाकड पुल ते पिंपळे-निलख स्मशानभूमी, औंध – सांगवी पुल ते दापोडी हॅरिस ब्रीज, आणि बोपखेलपर्यंत ‘ड’, ‘ह’ आणि ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील जलपर्णी काढून नदीचे संपूर्ण पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे. तसेच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील बोपखेल, रामनगर, गणेशनगर या भागातील मुळा नदीपात्र स्वच्छ करण्यात येणार आहे.

या कामासाठी मुंबई येथील साई प्राईट यांनी 2 कोटी 29 लाख रूपये हा लघुत्तम दर सादर केला. त्यानुसार, साई प्राईट यांच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे. ही जलपर्णी काढल्यानंतर आठ महिने कालावधीपर्यंत नदीपात्र नियमित स्वच्छ ठेवणे या संस्थेला बंधनकारक करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here