Chaupher News
दिल्ली : दिल्ली हिंसाचाराच्या चौकशीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला शिव विहारच्या जवळील गोविंद विहार भागात एक अवैध अॅसिडची फॅक्टरी आढळून आली आहे. दिल्लीत मोठा विध्वंस करण्याच्या हेतूनेच हा साठा करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या अवैध फॅक्टरीमध्ये मोठ्या पाण्याच्या टाक्यांमध्ये ६० हजार लिटर अॅसिडचा साठा आढळून आला आहे. इथे पाण्याच्या टाक्यांवर ‘गंगाजल’ असे लिहिले आहे. दरम्यान अशीही माहिती मिळतेय की, आम आदमी पार्टीचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसैन याच्या घरापर्यंत हे अॅसिड पोहोचवलं जात होतं. काही स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, दिल्लीत हिंसाचार सुरु होण्यापूर्वी या फॅक्टरीमध्ये संशयीत लोकांची हालचाल मोठ्या प्रमाणावर वाढली होती. पोलिसांनी या अवैध फॅक्टरीला सील करण्याचे आदेश दिले आहेत. टाइम्स नाऊने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये सुरु झालेल्या वादाने २३ फेब्रुवारी रोजी हिंसक रुप घेतले. उत्तर पूर्व दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर, भजनपुरा, बाबरपुरा, कर्दमपूर, कबीर नगर, यमुना विहार आणि शिव विहार या भागांमध्ये २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भीषण हिंसाचार झाला होता.