Chaupher News
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपकडून संतोष लोंढे यांचा तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भालेकर यांचा उमेदवारी अर्ज आज (सोमवारी) दाखल करण्यात आला. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य असून भाजप 11 सदस्यांसह बहुमतात आहे. त्यामुळे संतोष लोंढे यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यावर अधिकृतरित्या शुक्रवारी (दि.6) शिक्कामोर्तब होईल.
संतोष लोंढे यांचा अर्ज दाखलकरताना महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, मावळते स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, माजी महापौर राहुल जाधव, भीमाबाई फुगे, नगरसेवक कुंदन गायकवाड उपस्थित होते.
लोंढे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सुवर्णा बुर्डे आणि अनुमोदक म्हणून राजेंद्र लांडगे यांची स्वाक्षरी आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.
राष्ट्रवादीकडून पंकज भालेकर यांचा अर्ज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांचा उमेदवारी अर्ज आज (सोमवारी) दाखल करण्यात आला आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थायीचे सदस्य मयुर कलाटे, पौर्णिमा सोनवणे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक प्रवीण भालेकर आदी उपस्थित होते. भालेकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून मयुर कलाटे तर अनुमोदक म्हणून अनुमोदक म्हणून पौर्णिमा सोनावणे यांची स्वाक्षरी आहे.
शुक्रवारी निवडणूक
पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली आहेत. 6 मार्च रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत.