Chaupher News
मुंबई : शिवसेनेला अयोध्येत जाऊन रामाशी नातं आहे हे दाखवावं लागतं. मात्र, आमची छाती फाडली तरी रामच दिसेल असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर पाटील यांनी जोरदार टीका केलीय. तर, प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत गेलेल्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वावरुन भाजपवर टीकेचा बाण सोडलाय. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, शिवसेना भाजपपासून दूर गेलीय मात्र हिंदुत्त्वापासून दूर गेलेली नाही. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतलाय.
महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केलीय. शिवसेनेला अयोध्येत जाऊन रामाशी नातं आहे, हे दाखवावं लागतं. मात्र, आमची छाती फाडली तरी रामच दिसेल असं वक्तव्य पाटील यांनी केलं. 1925 सालापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदू राष्ट्राची सांस्कृतिक संकल्पना मांडली आहे. हा सांस्कृतिक राष्ट्रवाद उद्धवजींना आधीपासून मान्य होता. आता काँग्रेसलाही मान्य झाला असेल तर फारच चांगलं आहे, असा टोलाही पाटील यांनी काँग्रेसला लगावला. याची देही याची डोळा आम्हाला हिंदू राष्ट्रवाद साकार झाल्याचे पाहायला मिळत असल्याचेही ते म्हणाले.