Chaupher News

पिंपरी : स्त्रियांमध्ये बचत हा जन्मतःच गुण असल्यामुळे महिला बचत गटांची संकल्पना रुजल्यानंतर महिलांना महिलांचे एक वेगळे व्यासपीठ मिळाले आहे. त्यातून महिलांमध्ये जिज्ञासू भावना तयार झाली आहे. बचत गट हे महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल बनविण्यासाठी उत्तम संधी आहेत. रोजगार आणि आत्मसन्मान या दोन्ही चांगल्या गोष्टी बचत गटाच्या माध्यमातून एखादी स्त्री कामावू शकते, असे प्रतिपदान महापौर माई ढोरे यांनी रविवारी (दि. ८) केले

जागतिक महिला दिनानिमित्त निगडी प्राधिकरण येथील गायत्री हॉटेलमध्ये महिला बचत गट महासंघाच्या वतीने महिला बचतगटांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर माई ढोरे बोलत होत्या. यावेळी महिला बचत गट महासंघ प्राधिकरणाच्या अध्यक्षा हर्षदा थोरात, महालक्ष्मी बचत गटाच्या अध्यक्षा प्राजक्ता किरवे, स्वामिनी महिला बचत गट अध्यक्षा पूनम सपकाळ, जोगेश्वरी महिला बचत गट अध्यक्षा संगिता यादव, माहेश्वरी महिला बचत गट अध्यक्षा संगिता भोसले, लोकमान्य हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण जोशी, भाजपचे शहर सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, “बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणार गट आहे. बचत गट ही संकल्पना सर्वसमावेशक आहे. बचत गट म्हटले की महिला हे जणू समीकरणच बनले आहे. बचत गटाला मोठे करण्यात महिलांचा सर्वात मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात बचत गटांच्या माध्यमातून महिला आणि व्यवसाय यांची जणू एक चळवळच उभी राहिली आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही प्रत्येक भागात अनेक छोटे मोठे बचत गट आज कार्यरत आहेत. त्या माध्यमातून स्त्री आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेन वाटचाल करत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचत गटांना आर्थिकदृष्टी सक्षम करण्यासाठी महापालिकेमार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ महिला बचत गटांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.”

बचत गट महासंघ प्राधिकरणाच्या अध्यक्षा हर्षदा थोरात म्हणाल्या, “आत्मविश्वासपूर्ण आणि स्वतःच्या पायावर उभी राहिलेली स्त्री ही खऱ्या अर्थाने देशाच्या आर्थिक विकासातील योगदानाची साक्ष आपल्याला बचत गटांच्या माध्यमातून देताना दिसत आहे. आर्थिक सक्षमीकरण ही प्रत्येकाची गरज आहे. घर आणि संसार यासोबत स्वतःला उभे करण्यासाठी प्रत्येकीला विशिष्ट वेळ काढून घराबाहेर पडायला जमतच असे नाही. अशावेळी स्वतःच स्वतःच्या अडचणींवर मात करत सहकार्याने वाटचाल करता यायला हवी. बचत गट स्थापन करण्यासाठी गरज असते विश्वास आणि सहकार्याची. सुरूवातीला अनेक महिलांना बचत गट या संकल्पनेविषयी प्रश्न असू शकतात. ते प्रश्न सोडविण्यासाठी अशा प्रकारचे मेळावे पुन्हा पुन्हा घेऊन त्या माध्यमातून महिलांच्या शंका सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकमान्य हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण जोशी यांनी महिला आजारांविषयी काय काळजी घ्यावी, याबाबत महिलांना मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here