Chaupher News

पुण्यात पाच जणांना कोरोनाची लागण झाली असून या सर्वांवर पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये उपचार करण्यात येत आहेत. पुण्यातील एका दाम्पत्याला करोना संसर्ग झाल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट झाले. हे दांपत्य दुबई येथे सहलीसाठी जाऊन आले होते. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या दोघांपैकी एका रुग्णामध्ये सोमवारी करोनाची सौम्य लक्षणे दिसून आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना लोकांनी घाबरुन जाऊ नये, तसंच योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “या टॅक्सी चालकाच्या गाडीत जे बसले होते, ज्यांच्याशी याचा संपर्क आला त्या सात ते आठ जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यांना लागण झाली की नाही याची तपासणी सुरु आहे. रिपोर्ट आल्यानतंर जर लागण झाली असेल तर त्याची व्याप्ती आणखी वाढू शकते”.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकांना आवाहन करताना घाबरु नका, मात्र काळजी घ्या असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करण्याची विनंती करताना स्वत:चं डोकं लावून औषधं घेऊ नका असंही आवाहन केलं. काही शंका आल्यास डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणं तसंच उपचार घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. यानिमित्ताने मीदेखील हे आवाहन करतो असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

“लोकांना माझं आवाहन आहे की घाबरुन जाऊ नका. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आवाहन केलं आहे तशी काळजी घ्या. लोकांशी थेट संपर्क होणार नाही याची खबरदारी घ्या. खोकला आल्यानंतर रुमाल वापरणे अशा गोष्टींची काळजी घेण्याची नितांत गरज आहे,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here