Chaupher News

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष भोपाळकडे लागले होते. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. ज्योतिरादित्य यांनी लोकांची शंका रास्त ठरवत काँग्रेसचा हात सो न आज (बुधवार) भाजपामध्ये प्रवेश केला. दिल्लीतील भाजपा मुख्यालयामध्ये भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, खा. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान, ते गुरूवारी भोपाळला जाणार असून १३ मार्च रोजी ते राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत.

“आमच्यासाठी आज आनंदाचा दिवस आहे. भाजपात मुख्य प्रवाहात त्यांना काम करण्याची संधी मिळेल याचं आम्ही आश्वासन देतो,” असं जे.पी. नड्डा यावेळी म्हणाले. तसंच ज्योतिरादित्य शिंदे यांचं पक्षासाठी योगदान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“प्रत्येकाच्या जीवनात अशी काही वळणं येतात जी त्यांच्या जीवन बदलतात. माझ्या आयुष्यातही असे दोन महत्त्वाचे दिवस होते. पहिला दिवस म्हणजे ज्या दिवशी मी माझ्या वडिलांना गमावलं आणि दुसरा कालचा ज्या दिवशी मी माझ्या आयुष्यातला मोठा निर्णय घेतला. माझं ध्येय कायम जनतेची सेवा करावी हेच होतं. माझ्या वडिलांनंतर जो कार्यकाळ मला मिळाला तो पूर्णपणे मी देशसेवेसाठी दिला आहे. त्यांच्या माध्यमातून मला जनतेची सेवा करता येत नव्हती. यापूर्वी जी काँग्रेस होती ती आता नाहीये,” असं शिंदे यांनी नमूद केलं. “मी माझ्या राज्यासाठी स्वप्न पाहिलं होतं, परंतु ते १८ महिन्यांतही ते पूर्ण झालं नाही. शेतकऱ्यांना जी मदत मिळणार होती, तीदेखील अद्याप मिळालेली नाही. त्या ठिकाणी रोजगाराचे नाही, तर भ्रष्टाचाराचे उद्योग सुरू झाले आहेत. मला आज हे व्यासपीठ मिळालं त्यांच्या मदतीनं आम्ही जनतेची सेवा करत पुढे जाऊ,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा जनतेनं संधी दिली आहे. त्यांनी जागतिक स्तरावर देशाचं नाव उंचावलं आहे. भविष्यातील संकटांचा सामना करण्याच्या योजनाही त्यांनी तयार केल्या. त्यांच्याकडे ती क्षमता आहे. भारताचं भविष्य त्यांच्या हाती आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here